अहमदनगर महापौर निवडणूक; भाजपला पाठिंबा देणाऱ्या बसपाच्या ४ नगरसेवकांचे निलंबन

0
772

अहमदनगर, दि. ३ (पीसीबी) –  अहमदनगर महापालिकेच्या  महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याप्रकरणी बसपच्या चार नगरसेवकांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल निलंबित  करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांवर कारवाई करण्याबाबत शुक्रवारी (दि.४)   निर्णय घेण्यात येणार आहे.

बसपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी चौघा नगरसेवकांच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बसपने उमेदवार उभे केले होते, आणि ते निवडूनही आले. मात्र आता झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी पक्षाविरोधात जाऊन भाजपला जाहीर पाठींबा दिला. त्यांच्यासोबतच बसपच्याही ४ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. बसपने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून निवडून आलेल्या चार नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे साखरे यांनी सांगितले.