…असले फितूर वाघ असूच शकत नाहीत; अजित पवारांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

0
571

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – गेली ५ वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावाने मते मागणे म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.  

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगर मतदरासंघातून आपला उमेदवारी अर्ज आज (शनिवार)  दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. यावर अजित पवार यांनी ट्विट करत  हल्ला चढवला.

दरम्यान, युती होण्याआधी अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यासोबत हजेरी लावल्याने विरोधकांकडून  त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आता  अजित पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना  फितूर वाघ असूच शकत नाहीत,  असे म्हटले आहे.