अयोध्या आणि राम मंदिराच्या मुद्यावर मतं मागणे थांबवा – खासदार संजय राऊत यांचा भाजपवर प्रहार

0
227

 मुंबई, दि. २६ (पीसीबी) : “अयोध्येच्या आणि राम मंदिराच्या प्रश्नांवर मतं मागणे आता तरी थआंबवा. रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका”, असा घणाघात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरात केला आहे. अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली.

“राममंदिर जन्मभूमीचे राजकारण सदैव सुरुच राहिले. ते 5 ऑगस्टला तरी कायमचे संपावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्राकांड घडले. अयोध्येतून निघालेली साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्थानकावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही गाडी पेटवण्यात आली, या संशयातून गुजरातमध्ये जो दंगा झाला तो सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान असाच होता. या दंगलीने मोदी यांना आधी हिंदूंचे नेते आणि नंतर पंतप्रधान केले. म्हणजे या राजकीय चढाओढीतही राम आहेच”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“गुजरातमध्ये गोध्राकांड घडले नसते तर आजच्या मोदींचे स्थान आणि रुप आपल्याला पाहता आले नसते. अयोध्येनंतरच्या दंगलीने शिवसेना-भाजप युतीला सत्ता प्राप्त झाली. मुंबईसह महाराष्ट्रात तेव्हा हिंदुत्वाची लाट उसळली. तसे साबरमती एक्सप्रेसच्या गोध्राकांडानंतर पंतप्रधान मोदी हे हिंदुत्ववादी नेते म्हणून पक्के झाले”, असं संजय राऊत म्हणाले.

“छत्रपती शिवाजीराजे आणि प्रभू श्रीराम या दोन विभूतींच्या नावाने जितके राजकारण गेल्या 30 वर्षांत झाले ते पाहिले की, आपण आजही श्रद्धा आणि भावनेच्या विषयांतच गुंतून पडलो आहोत याची खात्री पटते”, असंदेखील संजय राऊत म्हणाले.