अमेरिकेतील महापालिकेच्या कार्यालयावर गोळीबार

0
540

वॉशिंग्टन, दि.१ (पीसीबी) – अमेरिकेतील व्हर्जीनिया प्रांतात एका सशस्त्र हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला. ही घटना एका महापालिकेच्या कार्यालयात शुक्रवारी संध्याकाळी घडली. गोळीबारात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर १५ जण जखमी असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबाबी कारवाईमध्ये हल्लेखोराला ठार मारण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तो याच कार्यालयातील एक कर्मचारी होता. विशेष म्हणजे, अमेरिकेत या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत गोळीबाराच्या १५० हून अधिक घटना घडल्या आहेत.


व्हर्जीनिया पोलिस प्रमुख जेम्स सर्वेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका कार्यालयात शुक्रवारी संध्याकाळी वाजेच्या सुमारास हल्लेखोर अचानक घुसला. यानंतर त्याने सर्वच कर्मचाऱ्यांवर बेछूट गोळीबार सुरू केला. या हल्ल्यामागचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. स्थानिक पोलिसांसह एफबीआयचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रत्युत्तर देत हल्लेखोराला ठार मारले. गोळीबाराच्या प्रत्यक्षदर्शी राहिलेल्या कर्मचारी मेगन यांनी सांगितले, की गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांनी आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांनी आपआपल्या टेबलाखाली लपून जीव वाचवला. त्यापैकीच एकाने आपातकालीन हेल्पलाईनला फोन करून पोलिसांना बोलावले. व्हर्जिनिया बीच सिटीचे महापौर बॉबी डेर म्हणाले, की ही घटना शहराच्या इतिहासातील सर्वात हिंसक घटना होती. यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये सगळेच त्यांचे सहकारी आणि मित्र होते असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.