अबब…मेहुल चौकसी सहित ५० डिफॉल्टर्सचे ६८,६०७ कोटींचे कर्ज रिजर्व बँकेने केले माफ

0
739

नवी दिल्ली, दि, .२८ (पीसीबी) : भारतीय रिजर्व बँकेने फसवणूक प्रकरणात फरार असलेला हीरे व्यापारी मेहुल चौकसी सहित ५० टॉप विलफुल डिफॉल्टर्स चे ६८,६०७ कोटीं रुपयांचे कर्ज माफ केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकार अंतर्गत दिलेल्या उत्तरात मान्य केली आहे. आईटी, इंफ्रास्ट्रक्चर, वीज निर्मिती, सोने – हिरे- आभूषणे व्यापार, फार्मा आदी विविध क्षेत्रातील जाणून बुजून कर्ज बुडविलेल्यांचा (विलफुल डिफॉल्टर) या कर्ज माफीच्या यादीत समावेश आहे.
लोकसभेमध्ये कांग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी कर्ज थकबाकीदरांची माहिती तारांकित प्रश्नाद्वारे सरकारला मागितली होती. परंतु केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती देण्यास नकार दिला होता. माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी आरबीआय कडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून १६ फेब्रुवारी पर्यंत कर्ज थकबाकीदरांची माहिती मागितली होती. रिजर्व बँकेचे माहिती अधिकारी अभय कुमार यांनी महिती अधिकारातील उत्तरात ३० सेप्टेंबर २०१९ पर्यंतचे ६८,६०७ कोटीं रुपयांचे कर्ज माफ केल्याची कबुली दिली.
थकबाकीदारांच्या यादी मध्ये सर्वात टॉपवर मेहुल चौकसी याच्या घोटाळ्यातील कंपनी गीतांजली जेम्स लिमिटेड चे ५,४९२ कोटी, त्याचीच अन्य कंपनी गिली इंडिया लिमिटेड चे १,४४७ कोटी रुपये आणि नक्षत्र ब्रांँड्स लिमिटेडचे १,१०९ कोटी रुपये समाविष्ट आहेत. बैंक कर्ज घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यावर मेहुल चोकसी भारतातून फरार झाला होता. चौकसी याने एंटीगुआ अँड बारबाडोस या द्वीप समूहाचे नागरिकत्व घेतले आहे व त्याचा भाचा नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. कर्ज माफीच्या यादीमध्ये ४,३१४ कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या आरईआय ऍग्रो लिमिटेड यांचे नाव आहे.
४,०७६ कोटी रुपये कर्ज बुडवून फरार झालेला आरोपी विनसम डायमंड एंड ज्वेलरीचा मालक हिरा व्यापारी जतीन मेहता, २,८५० कोटी रुपये थकबाकी असलेले रोटोमैक ग्लोबल प्राइव्हेट लिमिटेड, २,३२६ कोटी रुपये थकीत असलेले पंजाबची कुडोस कीमी हि कंपनी, २,२१२ कोटी रुपये थकीत असलेले योगगुरु बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांची इंदौर स्थित रूची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड, २,०१२ कोटी रुपये थकीत असलेली ग्वालीयर येथील जूम डेवलपर्स प्राइव्हेट लिमिटेड, १,९६२ कोटी रुपये थकीत असलेली अहमदाबाद येथील स्थित फॉरएवर प्रेशियस ज्वैलरी एंड डायमंड्स प्राइव्हेट लिमिटेड आणि लंडन येथे फरार असलेला मद्यसम्राट विजय माल्या याच्या किंगफिशर एयरलाइंस लिमिटेडचे १,९४३ कोटी रुपये थकीत असलेल्या कंपनीचे नाव देखील रिजर्व बैंकेच्या कर्ज माफीच्या यादीत समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा दाखला देत परदेशी थकबाकीदारांची माहिती देण्यास रिजर्व बैंकेने नकार दिला.
राष्ट्रीयकृत बँकांची फसवणूक करून विविध तपास यंत्रणांना गुंगारा देऊन फरार झालेल्या महाठगांचे जाणूनबुजून बुडविलेले कर्ज रिजर्व बँकेने माफ केल्याची माहिती उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.