अबब…माजी नगरसेवकाच्या संपर्कातील ५६ लोकांचा कोरोना पॉझिटिव्ह

0
397

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वेगाने वाढतो आहे. लक्षणे नसलेले लोक संपर्कात आल्याने कोरोना बाधा झाल्याचे असंख्य दाखले आहेत. पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवकाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यावर खळबळ उडाली. नंतर त्याच्याच कुटुंबातील १४ लोक बाधीत झाल्याचे उघड झाले. त्याहिपेक्षा कहर म्हणजे महापालिका आणि राजकीय वर्तुळातील ज्या ज्या लोकांच्या संपर्कात हे महाशय आले होते त्या सर्वांची तपासणी केली असता तब्बल ५६ लोकांना बाधा झाल्याचे उघड झाल्याने घबराट उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत असून बाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. आज, मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत 81 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 2027 झाली आहे. 10 मार्च ते 11 जून या 105 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. शहराला रेडझोनमधून वगळून काल एक महिना पूर्ण झाला. रेडझोनमधून वगळल्यानंतर महिन्याभरात तब्बल 1762 नवीन रुग्णांची वाढ झाली.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. शहराला कोरोनाने अशरक्ष: विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिवसाला 100 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. काल एकाचदिवशी दीडशे जणांना लागण झाली आहे.

रेडझोनमधून वगळल्यानंतर मोठी वाढ –
बाजारपेठ खुली झाल्यानंतर कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. परिणामी, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मार्च, एप्रिल या दोन महिन्यात शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात होती. 10 मार्च ते 22 मे पर्यंत शहरातील रुग्ण संख्या 265 वर जाऊन पोहोचली होती. त्यातच 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले. रेडझोनमधून वगळल्याने महापालिकेने विविध सुविधा सुरु केल्या. बाजारपेठा, दुकाने, कंपन्या सुरु करत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी, रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली. नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून आले नाही. वाईन शॉप्स सुरू झाल्यापासून ही गर्दी आणखी वाढत गेली. निर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली. ही रुग्ण वाढ सुरुच आहे. रेडझोनमधून वगळून काल एक महिना पूर्ण झाला. या महिन्याभरात तब्बल 1762 नवीन रुग्ण सापडले आहेत. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 2027 वर पोहोचली आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंतच तब्बल 81 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्यने दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

1181 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात –
शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली. तरी, त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 1181 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजमितीला 811 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 651 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 133 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 27 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, आजपर्यंत 35 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.