अज्ञात वाहनाची दिंडीला धडक; चिंचवड येथील तरुणाचा मृत्यू; ४ जखमी

0
899

मावळ, दि. २ (पीसीबी) – पायी दिंडी घेऊन चालेल्या पाच जणांना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.१) पहाटे तीनच्या सुमारास मावळातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नायगाव येथील पेट्रोल पंपाजवळ घडला.  

याज्ञिक रवींद्र मोरे (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शारदा शाम वाळुंजकर (वय ४२), स्वाती तुळशीराम कोळी (वय ३०), सुनीता हिरानंद पाटील (वय २५), आणि अक्षय सुनील बरावकर (वय १९, सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी चार जणांची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव येथील पेट्रोल पंपाजवळून मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पाच भाविक दिंडी घेऊन चालले होते. यावेळी एका भरधाव अज्ञात वाहनाने दिंडीतील पाच जणांना जोरदार धडक दिली. यामध्ये याज्ञिक मोरे या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चिंचवड वाल्हेकरवाडीतील इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.