अजित पवारांची ‘ती’ भीती खरी ठरली …

0
930

सिंधुदुर्ग , दि. ३१ (पीसीबी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. 19 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे. आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 19 पैकी 14 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर 5 जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
तेली पराभूत
या निवडणुकीत भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांचा सुशांत नाईक यांनी पराभव केला आहे. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.
भाजपच्या हाती जिल्हा बँक येताच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खणखणीत नाणे, नारायण राणे आणि आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तर काही जणांनी नितेश राणेंचे फोटोही व्हायरल केले आहे. या फोटोवर गाडलाच असं लिहिलं आहे.
भाजपचे प्रकाश बोडस, दिलीप रावराणे, मनीष दळवी, महेश सारंग, अतुल काळसेकर, विठ्ठल देसाई, बाबा परब, समीर सावंत, गजानन गावडे, तर महाविकास आघाडीचे सुशांत नाईक, गणपत देसाई, विद्याप्रसाद बांदेकर विजयी झाले आहेत.