अखेर ठरलं!समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव.

0
330

मुंबई,दि.११(पीसीबी) –   मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालाअखेर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तर, भाजपने आधीच दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच नाव देण्याची घोषणा केली होती.

जवळपास ५६ हजार कोटी रुपये खर्चून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.१२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यांमधील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.