अंधारात लपून बसलेल्या चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक; पोलीस जखमी

0
507
सांगवी, दि. ४ (पीसीबी) – अंधारात लपून बसलेल्या चोरट्यांना पोलिसांनी हटकले असता चोरट्यांनी गस्तीवरील पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 4) पहाटेच्या सुमारास सांगवी येथे घडली.
पोलीस नाईक अमोल लावंड असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी अमोल लावंड आणि कल्याण भोसले सांगवी परिसरात रात्रगस्त घालत होते. दरम्यान, औंध रुग्णालया जवळ त्यांना काही चोरटे अंधारात लपून बसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवून मोठ्याने आवाज दिला.
पोलिसांचा आवाज ऐकताच चोरट्यांनी त्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत पोलीस नाईक लावंड जखमी झाले आहेत. तसेच, पोलिसांच्या दुचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.