संभाजी ब्रिगेडचा दणका ; शिवाजी महाराजांचा अवमान करणारे पोस्टर हटविले.

0
457

– मागणी लावून धरल्यानंतर इंद्रायणीनगर मधील माजी नगरसेवकाचा लेखी माफीनामा सादर.

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे फ्लेक्स शहरात लावले होते. त्याविरोधात संभाजी ब्रिगेडने आवाज उठविला. संबंधीत आरएसएसच्या कार्यकर्त्याला संपर्क करून जाब विचारला. पोस्टर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संबधीत कार्यकर्त्याने शहरातील फ्लेक्स हटविले. तसेच लेखी माफीनामाही सादर केला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.

काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्र राज्यातील बहुजनांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या विचारांवर चालणारी अनेक पिढी तयार होत आहे. राजांनी रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मातील नागरिकांचा विचार केला. मानसन्मान दिला. या राजाची महती संपूर्ण देशात आणि देशाबाहेर आहे. मात्र देशातील काही लोक महराजांचा अवमान करताना दिसत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात एका आरएसएसच्या विचाराने चालणाऱ्या इंद्रायणी नगर येथील माजी नगरसेवकाने इंद्रायणी प्रभागात दसऱ्यानिमित्त फ्लेक्स लावले होते. त्यावर आरएसएसच्या गोळवलकर यांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वापरली होती. शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा असफल प्रयत्न ही लोक करत आहेत. हे लक्षात येताच संबंधित माजी नगरसेवकाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारला. शिवाजी महाराजांचा अवमान केल्यास याद राखा,असा इशारा दिला. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर लावलेले फ्लेक्स त्वरित हटविण्यात आले आहेत. त्यावरही समाधान न झाल्याने लेखी माफी द्यावा, अशी मागणी संघटनेने लावून धरली. संघटनेच्या इशाऱ्याला घाबरून माजी नगरसेवकाने लेखी माफीनामा सादर केला.

अवमानप्रकरणी निषेध करणार : काळे

राजांचा अवमान करणारे फ्लेक्स सर्व प्रभागात लावण्यात आले होते. त्यामुळे प्रभागात चुकीचा संदेश गेला आहे. त्याचा निषेध करण्याची भूमिका अनेकांची आहे. त्यानुसार आंदोलन करत संबधीत माजी नगरसेवकांचा निषेध करणार आहे. या निषेध आंदोलणात संभाजी ब्रिगेड देखील सहभागी होईल,असे सतीश काळे म्हणाले.