महापालिका कोणाची, ठरणार चिंचवडच्या आखाड्यात – थर्ड आय : अविनाश चिलेकर

469

पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहराचा राजकीय सातबारा हा तसा शरद पवार यांच्या नावाचा. जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, पालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचात किंवा दूध संघांपासून, जिल्हा बँक, विविध कार्यकारी सोसायट्यांपर्यंत अपवाद वगळता संपूर्ण मक्तेदारी राष्ट्रवादीचीच. बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड हे अजितदादांचे तसे दुसरे हक्काचे घर. पवारांची भक्कम तटबंदी असल्याने या गडाला धडक मारुन कपाळमोक्ष नको म्हणून काँग्रेस काय किंवा शिवसेना काय यांनी शरणागतीच पत्करली होती. दरम्यान २० – २५ वर्षांत अजितदादा पवार यांनी ज्या पध्दतीने पिंपरी चिंचवड शहराचे रुपडे बदलले आणि नावारुपाला आणले ते पाहता तिथे आव्हान देणे म्हणजे आत्मघात होता. हे काम वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे होते. काळाची पावले ओळखून नेमके तेच धाडस दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले म्हणून ते वेगळे होते. पवार यांच्याच तालमित तयार झालेल्या भाऊंनी अजितदादांच्या एकाधिकारशाहीला अक्षरशः सुरूंग लावला. २०१७ च्या महापालिका निवडणुकित तो इतिहास घडला. नरेंद्र मोदी यांच्यावरचा जनतेचा गाढ विश्वास, देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ, आश्वासक कार्यपध्दत आणि त्या जोडिला याच मातीतला तमाम सामान्य जनतेशी जोडलेला आमदार जगताप यांचा अफाट जनसंपर्क, असा हा त्रिवेणी संगम झाला. खरे तर, त्यातूनच पवार यांचा तंबू उखडला. महापालिकेत ८ – १० जागांवरची भाजप ७७ जागांवर आली आणि नेहमी ७० – ८० जागांचे गणित मांडणारी राष्ट्रवादी त्यावेळी ३६ जागांवर अडकली. अक्षरशः चमत्कार झाला होता. केवळ आणि केवळ आमदार जगताप होते म्हणून इथे अशक्य ते शक्य झाले आणि स्वप्नातसुध्दा नसताना भाजपची सत्ता आली. सत्तेचे समिकरण मांडताना साम, दाम, दंड, भेद कुठे कसे वापरायचे याचे तंत्र-मंत्र फक्त जगताप यांनाच ठाऊक होते. गल्लीतला प्रत्येक कार्यकर्ता कोण किती पाण्यात, कोणाची किती ताकद ते फक्त भाऊच जाणत होते. कारण ते शरद पवार यांची शागीर्द होते. महापालिका निकालापूर्वीच मला खासगीत बोलताना त्यांनी, “आमचा नगरसेवकांचा आकडा ७८ असेल लिहून ठेव“, असे छातीठोकपणे सांगितले होतं. दुसऱ्या दिवशी निकालनंतर पुन्हा त्यांचा फोन आला आणि “काय म्हटले होते मी“, असे म्हणत त्यांनी धक्काच दिला. इतका सखोल अभ्यास आणि आत्मविश्वास असलेला एकही महाभाग मुरब्बी नेता आज भाजपमध्ये दिसत नाही. गेल्या पाच-सहा वर्षांत दुसरा कोणी असा नेता पैदा झाला नाही आणि स्वतः भाऊंनीपण होऊ दिला नाही. त्यामुळेच आता लक्ष्मण जगताप वगळून भाजप ही कल्पनाच पचनी पडत नाही. वाघाचे कातडे पाघरले म्हणून कोणी वाघ होत नाही किंवा कोणीही जगताप आडणाव असले म्हणून तो लक्ष्मण जगताप होत नाही. महापालिका निवडणुकिला भाजपची उमेदवारी देण्यापासून ते आर्थिकदृष्ट्या कमकूवत उमेदवाराला थेट २५ – ३० लाखाची रसद पुरविण्याची हिंमत जगताप यांच्यात होती. जवळपास ३०-३५ उमेदवार त्यांनी असे निवडूण आणले. ७७ पैकी ५२ नगरसेवक भाऊ समर्थक होते. अक्षरशः गल्लीबोळातल्या दगडांना शेंदूर फासून देव केले. पाच वर्षांत नगरसेवकांना मोठे करायचे काम भाऊंनी केले. दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप नगरसेवकांच्या वार्डमधील काम आणि दामसुध्दा आमदारांच्या नावावर जमा झाले. चिंचवड आणि भोसरी मध्ये हा फरक राहिली म्हणूनच भाजपसाठी काळ कठिण आहे.

वारसा कोण चालवणार –
आता आज चिंचवड पोटनिवडणुकिमुळे भाऊंचा वारसा कोण चालवणार हा मुद्दा आला. लोकभावना, भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचा कल आणि विरोधकांचे मत याचा मोगावा घेतला तर फक्त आणि फक्त भाऊंच्या पत्नी आश्विनी जगताप यांचेच नाव समोर येते. स्वतः आश्विनीताई त्या दुःखातून सावरल्या नाहीत, पण ३० वर्षांच्या सहवासातून त्यासुध्दा तयार झाल्यात. राजकारण्याची पत्नी असूनही कुठे घमेंड नाही. अत्यंत विनम्र, शालीन, सुजाण, घरंदाज आणि तितक्याच आधुनिक असे त्यांचे व्यक्तीमत्व. आमदार जगताप यांच्या धर्मपत्नी म्हणून त्यांना प्रचंड सहानुभूती आहे. म्हणूनच त्यांचे नाव सर्वांच्या लेखी आहे. जर का त्यांना उमेदवारी मिळालीच तर उद्या कदाचित बिनविरोधसुध्दा होईल आणि निवडणूक झालीच तरी त्यांचे पारडे जड राहिल. आता दुसरा पर्यांय जगताप यांचे धाकटे बंधू माजी नगरसेवक शंकर यांच्या नावाचा समोर आला. गेल्या दीड वर्षांत त्यांना परिस्थितीचा अंदाज आल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रमुख म्हणून पद घेऊन संपर्क सुरु केला. शंकर यांना स्वीकार्हता दिसत नाही. भाजपमधील भाऊंचे समर्थक असलेले नगरसवेकच विरोधात ठाकलेत. जे नगरसेवक भाजमधून राष्ट्रवादीत जाणार होते त्या १४-१५ नगरसेवकांनी सरळ सरळ सांगितले की, आश्विनीताईंना संधी द्या आणि शंकर यांना उमेदवारी मिळालीच तर आमचा रस्ता मोकळा आहे. भाजपसाठी हा बाका प्रसंग आहे. धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी गत आहे. ही सगळी परिस्थिती हाताळायला किंवा त्यावर तोडगा काढायला फडणवीस वारंवार इथे येणार नाहीत आणि दुसरी कोणाची ती धमक नाही. आमदार जगताप यांची प्रशासनावर आणि राजकारणावरही एक जबरदस्त पकड होती, जरब होती. आता तसे नेतृत्व भाजपकडे नाही. आमदार महेशदादांना अजून थोडा वेळ लागेल. दुसरे महत्वाचे म्हणजे भाजपचा उमेदवार चुकला की पुढची सगळी गणिते बिघडणार आहेत. वारसा हा लादायचा नसतो, तो जनतेने ठरवायचा असतो.

महापालिका निवडणुकिसाठी रंगीत तालिम –
२०२३ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकिसाठी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक हा टर्निंह पाँईंट आहे. चिंचवडची निवडणूक भाजपने जिंकली तर महापालिकेसाठी राष्ट्रवादीला खूप मेहनत करावी लागेल. आणि जर का राष्ट्रवादीने बाजी मारली तर मरगळलेल्या राष्ट्रवादीला जोश येईल. १२८ पैकी चिंचवडचे ५२ आणि पिंपरीचे ३५ नगरसेवक हे जगताप यांच्या पंखाखाली होते. आता ते छत्र नसल्याने हे नगरसेवक सैरभैर आहेत. स्वसामर्थ्यावर आलेले सोडून ज्यांना वाली नाही ते आधार शोधत आहेत. पूर्वी जे जे राष्ट्रवादीतून भाजमध्ये आले होते ते जवळपास ४० आजी-माजी नगरसेवक आता पुन्हा संभ्रमात आहेत. काहीजण याकडे संधी म्हणून पाहतात तर काही चाचपडत आहेत. खरे तर या परिस्थितीचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो, पण दस्तुरखुद्द अजित पवारसुध्दा भाजपकडे तोंड करुन बसलेत. महापालिका जिंकायची असेल तर चिंचवडची पोटनिवडणूक जिंकलीच पाहिजे, असा निश्चय राष्ट्रवादीत दिसत नाही. फडणवीसांनी गळ घातली आणि अजितदादा खरोखर पाघळलेच तर काय, अशीही शंका अनेकांना आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून महाआघाडी म्हणून एकदिलाने लढलेच तर भाजपचा टांगा अगदी आरामात पलटी होऊ शकतो. या फुग्यात ज्यांनी हवा भरली होती ते आमदार जगताप काळाच्या पडद्याआड गेल्याने फुगा फुटणार आहे. आगामी काळात महापालिका कोणाची असणार याची ही रंगीत तालिम आहे. नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी आमदारकीच्या प्रचारात झोकून देऊन काम केले तर त्याचाच फायदा त्यांना महापालिकेला होणार आहे. या निमित्ताने भाजपची खरोखर इथे ताकद किती आहे त्याचेही नेमके मूल्यमानपन होणार आहे. चिंचवड जगताप यांनी मारले तर महापालिका भाजपचीच असेल आणि राष्ट्रवादीने जिंकले तर मात्र, पुन्हा अजित पवार यांचेच पर्व इथे नव्या जोमाने सुरु होईल.