दारूचा ग्लास सांडला म्हणून केला खून

70

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – दोघेजण एकत्र दारू पीत असताना एकाकडून दारूचा ग्लास सांडल्यामुळे त्याचा खून केला. त्यांनतर मृतदेह कच-याच्या गाडीत टाकून तो कचरा महाळुंगे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकला. या प्रकरणातील दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

निलेश सतीश धुमाळ, राजेंद्र थोरात अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मयताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे नाव बालाजी असून तो नांदेड येथील असल्याचे आजवरच्या तपासात समोर आले आहे. तो पिंपरी-चिंचवड परिसरात फिरस्ती होता.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी सायंकाळी माण-महाळुंगे रोडच्या बाजूला कच-यात एक अनोळखी मृतदेह आढळला. त्याची ओळख पटली नव्हती. डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. त्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी हिंजवडी पोलिसांची दोन पथके तयार केली. आरोपी निलेश आणि मयत हे एकत्र दारू पीत होते. बालाजीकडून निलेशचा दारूचा ग्लास सांडला. त्या कारणावरून निलेशने काठीने, दारूच्या बाटलीने तोंडावर, डोक्यावर तसेच शरीराच्या विविध भागात मारहाण करून बालाजीचा खून केला असल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून कचरा टाकणा-या गाडीची ओळख पटवून पोलिसांनी चालक राजेंद्र यालाही अटक केली. कंट्रीबार येथे काम करणारे अखिल आणि धर्मेंद्र या दोघांनी कच-यासोबत बालाजीचा मृतदेह देखील गाडीत भरला असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुरावा नष्ट केल्याची कलमवाढ करण्यात आली आहे.