दहा जणांच्या टोळक्याकडून तरुणावर खुनी हल्ला

0
66

दिघी, दि. 6 (पीसीबी) –

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करीत खुनी हल्ला केला. तसेच कारचीही तोडफोड केली. ही घटना माऊली नगर, दिघी येथे बुधवारी (दि. 4) रात्री घडली.

सुमित ज्ञानेश्वर शिंदे (वय 27, रा. वडमुखवाडी, च-होली) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वस्ताद महेश उपाडे, महेश उपाडे याचा भाऊ, यश मोहिते, दाद्या मोहिते व त्यांचे पाच ते सहा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित व आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात ठेऊन आरोपी यश मोहिते हा फिर्यादी यांचा मित्र नीलेश शिंदे यास फोन करून शिवीगाळ करीत होता. फिर्यादी सुमित हा त्याला समजावण्यासाठी गेला असता आरोपी महेश उपाडे याच्या भावाने फिर्यादीवर कोयत्याने डोक्यात मारले. मात्र सावध असलेल्या सुमित याने हात मध्ये घातल्याने तो वार हातावर झेलला. आरोपी यश मोहिते याने कोयत्याने फिर्यादी यांच्या पोटावर कोयत्याने वार केला. आरोपी महेश उपाडे याने बॅटने डोक्यात मारहाण केली. इतरांनी फिर्यादी यांचे मित्र महेश शिंदे, सुरज घेनंद, आकाश घेनंद यांना लाथाबुक्क्यांनी तसेच बॅटने मारहाण केली. फिर्यादी यांच्या कारवर दगड मारून नुकसान केले. तसेच जमलेल्या नागरिकांनाही धमकावले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.