यंदा विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’ नाहीच!

0
261

पिंपरी (पीसीबी) दि. १६ – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभारामुळे महापालिका शाळेत शिक्षण घेत असलेले तब्बल 41 हजारांहून अधिक विद्यार्थी यावर्षी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहिले आहेत.  यंदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा डीबीटीची रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नवीन शैक्षणिक वर्षांतच डीबीटीचे पैसे मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा 13 जून 2022 पासून सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 41 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी महापालिकेच्या वतीने दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश, एक स्वेटर, एक रेनकोट दिला जातो. तसेच शालेय साहित्यामध्ये दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही व इतर साहित्य दिले जाते. यंदा शाळा सुरू होऊन आठ महिने होत आले आहेत. या आठ महिन्यांत विद्यार्थ्यांना फक्त दोन शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटरचे वाटप करण्यात आले आहे.

दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही अशा विविध साहित्यांचे वाटप न करता त्याचे पैसे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. शिक्षण विभाग प्रथमच विद्यार्थ्यांसाठी डीबीटी करणार आहे. त्यामुळे वेळ लागत असल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आल्यानंतर आयुक्त सिंह यांनी नवीन शैक्षणिक वर्षातच डीबीटी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यंदाचे पैसेही पुढील वर्षांतच देण्यात येतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच डिबीटी राबविण्यात येत आहे. बॅंकेची क्‍यूआर कोड सिस्टीम आली असून या माध्यमातून पैसे न देता पालकांना मॅसेज जाईल. हा क्‍यूआर कोड दाखविला की पालिकेने ठरवून दिलेले शैक्षणिक साहित्य मिळेल. यासाठी 15 ते 20 दुकाने निश्‍चित करण्यात येतील. मात्र, यंदा डीबीटी होणार नसून नवीन शैक्षणिक वर्षांत डीबीटीची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

“या” साहित्यांचे मिळणार होते पैसे
दप्तर, रेनकोट, काळे बूट, पीटी शूज, मोजे, पाणी बॉटल, कंपास पेटी, व्यवसायमाला, स्वाध्यायमाला, चित्रकला वही, नकाशा, 100 आणि 200 पानी वही या साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार होते. शालेय साहित्य ठेकेदाराकडून दर मागविण्यात आले होते. एवढी सर्व प्रक्रिया होऊन देखील यंदा डीबीटी होऊ शकणार नसल्याने पालिका प्रशासनाचा निष्क्रिय कारभार समोर आला आहे.

काय आहे डीबीटी ?

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे पैसे देणार आहे. यासाठी या साहित्याचे पैसे थेट बॅंक खात्यावर जमा करणे (डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्सफर) डीबीटी असे म्हणतात. मात्र, सुरूवातीला विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे पैसे शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर पाठवण्यात येणार होते. मुख्याध्यापकांनी याला विरोध केला. त्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बॅंक खात्यावर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विद्यार्थी किंवा पालकांचे बॅंक खाते असणे बंधनकारक होते. सर्व विद्यार्थी किंवा पालकांचे बॅंक खाती काढून झाली असून 80 टक्के काम झाल्याचा दावा शिक्षण विभागाने नोव्हेंबर 2022 मध्ये केला होता. मात्र, एवढी सर्व प्रक्रिया होऊनही यंदा विद्यार्थ्यांना डीबीटीचे पैसेच मिळणार नसल्याने गोर-गरिब विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.