शिंदे-फडणवीसांना सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणच दिले नव्हते – ‘त्या’ पत्रामुळे उडाली खळबळ

0
189

मुंबई, दि.२७ (पिसीबी) : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून महाविकास आघाडीचे अनेक नेते हे सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे. हा शपथविधी सोहळा रितसर पार पडला असला तरी तत्पूर्वी राज्यपालांकडून बहुमत असणाऱ्या पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं जातं.

पण शिंदे-फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी निमंत्रणच दिलं नव्हतं, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा दावा केला आहे. संबंधित माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आल्याचंही नाना पटोलेंनी सांगितलं आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोलेंनी हा दावा केला.

यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाना पटोले म्हणाले, “खरं तर, माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत राजभवनातून एक पत्र मिळालं आहे. शिंदे-फडणवीसांना सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणच दिलं नव्हतं, अशा पद्धतीचं पत्र राज्यपालांच्या कार्यालयातून मिळालं आहे. आम्ही अनेकदा सांगत आहोत की, हे सरकार असंविधानिक आहे. पण आता माहिती अधिकारातून आणखी मोठी माहिती समोर आली आहे.”