जेष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन

0
611

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील दै. केसरीचे सर्वात जेष्ठ पत्रकार विजय भोसले (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दोनच दिवसांपूरर्वी भोसरी येथील एका खासगी हॉस्पिटलचे उद्घाटन कार्यक्रमात त्यांना भोवळ आली म्हणून वायसीएम मध्ये दाखल केले होते.

मूळचे सातार जिल्ह्यातील औंध येथील रहिवासी असलेले भोसले हे गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते. अत्यंत अभ्यासपूर्ण, आक्रमक, मुद्देसूद लिखाण शैली असल्याने त्यांची राजकारणात एक जरब होती.

शहरात नगरपालिकेच्या स्थापनेपासून सर्व घडामोडींचे ते साक्षिदार होते. महापालिकेतील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा त्यांनी पर्दाफाश केला होता. मंत्री, खासदार, आमदार आणि आजवरचे सर्व महापौर, नगरसवेकांमध्ये एक स्वतंत्र निर्भीड बाण्याचे हाडाचे पत्रकार अशी त्यांची ओळख अखेर पर्यंत कायम होती. त्यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली.