पाकिस्तानची फुट जागतिक शांतीच्या मुळावर ?

0
264

गेल्या काही महिन्यांमध्ये शेजारच्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. केवळ भारत द्वेष किंवा हिंदूंचा द्वेष या एकाच भयगंडातून  निर्माण झालेल्या या शेजारी राष्ट्राला लष्करासह अनेक घटकांनी वर्षानुवर्षे पोखरून काढले असून तो आर्थिक दिवाळखोरीच्या बरोबरच अभूतपूर्व फुटीच्या उंबरठ्यावर उभा  आहे. अखंड भारतातून निर्माण झालेल्या या शेजाऱ्याची सर्व स्तरांवरील अवस्था अत्यंत दयनीय असून तीच त्यांचा “भस्मासुर” ठरण्याची शक्यता आहे. शेजारी राष्ट्राच्या दैन्यावस्थेतून उभ्या ठाकणाऱ्या गंभीर धोक्याचा आढावा.*

लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या योजनेनुसार १४ ऑगस्ट १९४७ रोजी अखंड, एकसंघ भारतातून अट्टाहासाने,  धार्मिक विद्वेषातून बाहेर पडलेल्या पाकिस्तान या शेजारी मुस्लिम राष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे.   पाकिस्तानात केवळ लष्करच जास्त प्रबळ आहे असे नाही तर तेथील विविध राजकारणी पक्ष गट, भ्रष्टाचारी  प्रशासन, वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणारे जमीनदार,जहागीरदार, विविध धार्मिक समूह आणि मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ काबीज केलेले  उद्योग समूह अशा अनेक तोंडी रावणांनी पाकिस्तानचे मातेरे केलेले आहे. या सगळ्यांच्या निर्नायकी नेतृत्वामुळे पाकिस्तान आज दिवाळखोरीच्या व अभूतपूर्व फुटीच्या मार्गावर आहे. गेल्या ७५ वर्षाचा पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर तेथील लष्कर त्यांना पाहिजे तेव्हा देश ताब्यात घेऊन काम करते.   पाकिस्तानच्या निर्मितीनंतर आत्तापर्यंत किमान ५० टक्के वेळा तेथे “मार्शल लॉ” चेच राज्य होते. तेथील लष्कराला आव्हान देण्याचे धाडस आजवर कोणी केलेले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा राज्यकर्त्याला लष्कराच्या मदतीशिवाय हा देश कधीही चालवता आलेला नाही. किंबहुना पाकिस्तान हा लष्कराने चालवलेला तथाकथित लोकशाही देश आहे.

पाकिस्तानात निवडणूक होतात त्या लष्कराच्या इच्छेनुसार. लष्करच नेते निवडून सत्तेवर आणतात. क्रिकेटपटू इमरान खान हे त्याचे ताजे उदाहरण आहे. पाकिस्तान मधलं प्रशासन म्हणजे चोरांनी चालवलेली लूट असे चित्र आहे. तेथील अनेक प्रांतात आजही जहागीरदारांचे, जमीनदारांचे मोठं प्राबल्य आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सिंध मधील भुट्टो कुटुंबियांकडे तब्बल अडीच लाख एकर जमीन  आहे. त्यामुळे त्या परिसरातील मतदारांवर त्यांचाच प्रभाव.  निवडणुकीत कोणाला मतदान करायचं याचा निर्णय ही जहागीरदार मंडळी करतात.  तेथील  विविध धार्मिक समूह, सातत्याने जनतेला वेठीला धरत असतात.  अनेक वेळा इस्लामाबाद मधले प्रमुख रस्ते, वाहतूक बंद करणे असे त्यांचे उद्योग. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कोणतेही राजकीय नेते किंवा पोलीस या कोणामध्येही त्यांना थांबवण्याची हिंमत नाही.अर्थात काही वेळा लष्कर सुद्धा अशा धार्मिक गटांना अर्थसाह्य पुरवतात व त्यांच्याकडून हवी तशी कामे करून येतात. तेथे जो व्यवसाय, व्यापार चालतो त्या उद्योगांकडून पाकिस्तानची बाजारपेठ नियंत्रित केली जाते. एकाच वेळेला अनेक मंडळींनी,गटांनी किंवा समूहांनी आपापल्या स्वार्थासाठी चालवलेला देश म्हणजे पाकिस्तान हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक गटाचा पैसे मिळवणे  हाच  उद्देश आहे. त्यामुळे जोपर्यंत चालेल तोपर्यंत देश चालवायचा आणि  तुंबड्या भरत रहायच्या हाच त्यांचा व्यवसाय. आज पाकिस्तानची लोकसंख्या २५ कोटीच्या घरात आहे. डिसेंबर २०२२ मधील त्यांची महागाई २४.५ टक्क्यांच्या होती. कांदा, तांदूळ,  गहू डाळी यांच्यात अभूतपूर्व भाव वाढ झालेली आहे.येत्या काही महिन्यात तेथे पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाकिस्तानातल्या  नागरिकांकडे दोन नागरिकत्व आहेत. तिथले सर्व लष्करी अधिकारी किंवा न्यायमूर्ती यांच्याकडे परदेशाचे पासपोर्ट आहेत. तेथील सत्तेला चिकटलेली मंडळी ही केवळ बाराशे – तेराशे कुटुंबाशी निगडीत असून एकमेकांपासून निर्माण झालेले आणि विवाहाच्या बंधनाने एकमेकांशी जोडले गेलेले आहेत.  सातत्याने अमेरिकेसारख्या देशाकडून कर्जे घेणे, पूर्वीचे कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्जे काढणे एवढाच त्यांचा उद्योग सुरू आहे. पाकिस्तान कोणत्या गोष्टीमुळे जिवंत आहे असं जर विचारलं तर केवळ त्याचे उत्तर आहे . ७५ वर्षे जपलेला भारत द्वेष. ही मंडळी सातत्याने एकच उद्घोष सतत करत असतात आणि तो म्हणजे भारत आमचा शत्रू आहे, भारताला पाकिस्तान नष्ट करायचे आहे, भारताने आमचा काश्मीर हिरावून घेतला, भारतानेच १९७१ मध्ये पाकिस्तानचे तुकडे केले, काश्मिरी लोकांना भारतच त्रास देत आहे आणि भारतीय गुप्तहेर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत आहेत, अशा प्रकारचे निराधार आरोप करत राहून स्वतःचा देश चालवण्याचे काम ते करत आहेत. पाकिस्तानच्या मानसिकतेचे हेच गमक आहे. खरंतर पाकिस्तानच्या या सद्यस्थितीमध्ये भारताला काहीही देणेघेणे नाही.  परंतु तो आपला शेजारी आहे, एकेकाळी तो भारताचा भाग होता त्यामुळे भारताशी असलेली नाळ त्याची तुटता तुटत नाही अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली . खरं तर तेथे पैसे कोण कमवतात असे विचारलं तर सर्वसामान्य जनता नागरिक वगळता सर्व गटाची मंडळी तेथे पैसे कमवतात.  केवळ धंदेवाले,  जहागीरदार  नाही तर लष्कराचे सर्व वरिष्ठ अधिकारी,  विविध पक्षांचे राजकारणी,  उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी आणि धार्मिक गटांचे प्रमुख  परदेशातून आलेल्या देणग्यांमध्ये भागीदार असतात. स्वतःची रक्कम काढून घेतात आणि शिल्लक राहिली तर जनतेसाठी ती वापरली जाते. या सर्व मंडळींना पूर्ण कल्पना आहे की आज ना उद्या पाकिस्तानचे दिवाळे वाजणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कदाचित त्यांचे आणखी तीन चार  तुकडे वेगवेगळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  “तेहरीक ए तालिबान पाकिस्तान” या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या सीमेलगतच्या प्रदेशांमध्ये  समांतर सरकार निर्माण केले आहे. राजधानी इस्लामाबाद मध्ये सत्तेवर असलेले सरकार अस्तित्वाची लढाई लढत आहेत. खरा प्रश्न आहे तो जरी पाकिस्तानचे दोन चार तुकडे झाले तरी तेथे पुन्हा एकदा शांतता नांदू शकेल का किंवा पाकिस्तानची परिस्थिती समाधान कारक होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या घडीला पाकिस्तानातील जवळजवळ 36 टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे आणि जागतिक भूक निर्देशांकामध्ये 121 देशांमध्ये पाकिस्तानचा नंबर हा 99 वा आहे. सध्या त्याला अन्नधान्याची प्रचंड गरज आहे. खरंतर पाकिस्तान मध्ये असलेली सुपीक भूमी  सध्या उजाड होत आहे. एकेकाळी एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 19% वाटा हा पाकिस्तान मधील शेती उत्पादनाचा होता मात्र आज हाच देश यादवीच्या उंबरठ्यावर असून सर्वत्र भूकबळी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली . स्वातंत्र्यानंतरच्या काही काळामध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था बरी होती.  मात्र लष्कर सम्राट जनरल मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली या देशाची खऱ्या अर्थाने पीछेहाट सुरू झाली.  सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी भारताविरुद्ध चार युद्धे केली.त्याचा त्यांना आजवर फटका बसलेला आहे. त्यांनी केवळ सूडबुद्धीने अणुबॉम्ब निर्मितीचा निर्णय घेतला. आज जेव्हा त्यांच्या देशामध्ये यादवी युद्धाची शक्यता दिसत आहे तेव्हा संपूर्ण जगाला भीती आहे ती त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांची.  जर दहशतवाद्यांच्या हातात ही अण्वस्रे  पडली तर केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.   केवळ या अण्वस्त्रांच्या  बळावरच अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांकडून सातत्याने पैसे मागून देश चालवण्याची भूमिका पाकिस्तानने आजवर पुढे रेटली. करोनामुळे निर्माण केलेली स्थिती, युक्रेन रशिया यांच्यातील युद्ध यामुळे  संपूर्ण जगच अराजकता, मंदीच्या उंबरठ्यावर आहे .  त्यात भर म्हणून की काय पाकिस्तान मधली सध्याची स्थिती ही जगाला विनाशाकडे नेऊ शकतील अशी परिस्थिती आहे.  ब्राझील, रशिया. चीन,  दक्षिण आफ्रिका व भारत या “ब्रिक्स” मध्ये केवळ भारताचीच परिस्थिती समाधानाची आहे. युक्रेन युद्धामुळे रशियाची अवस्था खूपच बिकट होत चाललेली आहे.  चीन सारख्या साम्राज्यवादी देशाने ओढवून घेतलेले आर्थिक  मंदीचे संकट अभूतपूर्व आहे.  चीन आणि भारत यांच्यात सीमारेषांवर सतत काही ना काहीतरी कुरबुरी सुरू आहेत. त्याचा उभय देशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. आपले दोन्ही अन्य शेजारी म्हणजे बांगलादेश आणि श्रीलंका येथेही फारशी परिस्थिती चांगली नाही आणि हे दोन्ही शेजारी देश आर्थिक अडचणीत आहेत.

पाकिस्तानचे आर्थिक दुर्दैव लक्षात घ्यायचे झाले तर एकेकाळी अत्यंत सुंदर सुपीक असलेला हा प्रदेश  गेल्या वर्षी आलेल्या पुरामध्ये फार उध्वस्त झाला. आज जगातील कोणताही देश पाकिस्तानला आर्थिक मदत करण्यास तयार नाही याचे प्रमुख कारण त्यांचा आजवरचा पैसे खाण्याचा धंदा हे होय. कोणतीही आर्थिक मदत मिळाल्यानंतर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही आणि तेथे प्रभाव असलेल्या विविध गटांमध्ये ती सातत्याने वाटली जाते.कराचीच्या बंदरामध्ये तर आयात केलेला भाजीपाला सडत पडलेला आहे. त्याला कोणी खरेदीदार नाही.  पाकिस्तान मधील महागाई तर विचारायला नको इतक्या प्रमाणात झालेली आहे.दररोज संपूर्ण पाकिस्तानातील अन्नधान्याची स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे.  इंधनाचाही तुटवटा जाणू लागला आहे. डिझेल नाही म्हणून रेल्वे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत . सध्या पाकिस्तानला जी खरोखर धोका आहे तो तेहरीक  ए  तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा आहे.  ही तर खरं पाकिस्तानचीच सीमेपलीकडे निर्माण केलेली दहशतवादी संघटना. अशा  दिवाळीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेजारी राष्ट्राबाबत भारताने नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबाबत अनेक विचार आहेत. आजवर पाकिस्तानने भारतावर चार युध्ये लादली. सातत्याने भारतामध्ये दहशतवादी प्रशिक्षण देऊन पाठवले, भारतीय नागरिकांना प्रचंड मानसिक ताप, त्रास या पाकिस्तानने सतत दिलेला आहे हे नाकारता येणार नाही. पाकिस्तानात कोणत्याही प्रकारची उलथापालथ झाली तरी त्याचा त्रास भारताला झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

हिंदू आणि मुस्लिम या धार्मिक आधारावर वाटणी होऊन निर्माण झालेला पाकिस्तान हा कधीही आजवर भारताचा विश्वासू शेजारी नव्हता व तो यापुढेही कधी राहणार नाही हे निश्चित. हा धार्मिक राक्षस मोठ्या प्रमाणावर जखमी झालेला आहे एवढीच सध्याची परिस्थिती. दहशतवादाचा आधार घेतलेल्या या देशामुळे जागतिक शांतताच धोक्यात येण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.