प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी एकत्रीत लढूयात – अजित गव्हाणे

0
193

नाना काटे यांना पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विनंत

पिंपरी दि. १५ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील नेहमीच प्रतिगामी शक्तींच्या विरोधात ठाम उभी राहिली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिगामी शक्तींना नामोहरण करण्यासाठी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठींबा द्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्राद्वारे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांना केली आहे.

सध्या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे. महाविकास आघाडीच्या वतीने विठ्ठल उर्फ नाना काटे हे निवडणूक लढवित आहेत. नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात आघाडी घेतली असून महाविकास आघाडीतील सहभागी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह शेतकरी कामगार पक्षाने मोठी ताकद लावली आहे. याशिवाय नाना काटे यांना समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) , मातंग समाज व इतर अनेक पक्षांनी नाना काटे यांना पाठींबा देत विजयी करण्याचा निर्धार केला.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांना विनंती पत्र पाठविले आहे. या पत्रात गव्हाणे यांनी म्हटले आहे की, चिंचवडची पोटनिवडणूक ही सर्वार्थांने महत्त्वाची आहे. प्रतिगामी शक्तींच्या ध्येय-धोरणांमुळे लोकशाही अडचणीत आली आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत या शक्ती चालल्या आहेत. त्यांना रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या लढ्यात आपल्यासारख्या सहकाऱ्यांनी सहभागी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण एकत्र आल्यास हा लढा आणखी बळकट होईल.

त्यामुळे आपण हा लढा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी आपली ताकद लावावी व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला पाठींबा द्यावा, अशी विनंती गव्हाणे यांनी केली आहे. गव्हाणे यांनी केलेल्या विनंतीला वंचितचा प्रतिसाद मिळाल्यास नाना काटे यांना मोठी ताकद मिळणार हे निश्चित आहे. तर विजय अधिक मोठा आणि सहज शक्य होणार आहे.