चिंचवड, दि. २० (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा त्यांच्या समर्थकामध्ये खूप मोठा प्रभाव होता. कॅन्सरच्या आजाराने ३ जानेवारीला त्यांचे निधन झाले आणि सगळे जगताप समर्थक अक्षरशः शोकसागरात बुडाले. अशातच पोटनिवडणूक लागल्याने आता जगताप यांच्या आठवणी आणि श्रध्दांजली म्हणून त्यांच्या पत्नी आश्विनी यांनी विजयी कऱण्यासाठी ही मंडळी झटत आहेत. पण यापैकी एका समर्थकाने भाऊंचा देव केला आणि देव्हाऱ्यात ठेवल्याने तो आता चर्चेचा विषय आहे.
४० वर्षांच्या राजकीय जीवनात चार वेळी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि नंतर सलग चार वेळा आमदार झालेल्या भाऊंनी खऱ्या अर्थाने लोकांच्या मनावर राज्य केले. भोसरी आणि पिंपरी मतदारसंघाच्या तुलनेत चिंचवड मतदारसंघातील विकास कामे डोळ्यात भरतात कारण तिथे मिळालेले आमदार जगताप यांच्या सारखे खंबीर नेतृत्व. त्याचाच परिणाम तमाम विरोधक एक झाले पण जगताप यांचा पराभव करु शकले नाहीत. पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी च्या जनतेने त्यांना नेहमी भरभक्कम साथ दिलीच, पण वाकड, कस्पटेवस्ती सारख्या भागातही त्यांची लोकप्रियता आणि चाहत्यांची संख्या मोठी होती. त्याचाच परिणाम म्हणून की काय कस्पटेवस्ती मधील जगताप एका यांच्या कट्टर समर्थकाने दिवंगत भाऊंच्या फोटोचा चांदिचा टाक करुन घेतला आणि थेट देव्हाऱ्यात दैनंदिन पूजाअर्चा सुरू केली. त्याबाबत बोलताना रामदास कस्पटे म्हणतात,“भाऊ देवमाणूसच नव्हे, तर माझ्यासाठी देव होते आणि म्हणूनच त्यांचे स्थान आमच्या देव्हाऱ्यात आहे आण कायम राहिल.“
पीसीबी टुडे प्रतिनिधीशी बोलताना रामदास कस्पटे म्हणतात, मला राजकारणाची आवड आहे, पण कधी त्या हेतुने मी भाऊंबरोबर गेलो नाही. ते माझ्या नात्यात होते, पण त्याहिपेक्षा आमची निरपेक्ष, निखळ अशी मैत्री होती. मी त्यांचा चाहता होतो म्हणून गेली वीस वर्षे त्यांचा फोटो माझ्या गळ्यातील सोन्याच्या लॉकेटमध्ये आहे. आता ते देवाघरी गेले म्हणून आमच्या देव्हाऱ्यात आहेत. कुलदैवतांचा टाक जसे चांदिचे करतात तसा भाऊंचा फोटो मी चांदिमध्ये करुन घेतला आणि देवांच्या बरोबर त्या फोटोचीही मी पूजा करतो. कारण ते मला देवासमान आहेत.“