Pune

कसबा , चिंचवड हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ

By PCB Author

January 23, 2023

पुणे, दि. २३ (पीसीबी) : कसबा, चिंचवड हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ आहे. वर्षानुवर्षे आम्ही या मतदारसंघात काम केलं आहे. तसेच त्यामुळे या निवडणुकामंध्ये भाजपचाच विजय होणार आहे असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. याचवेळी त्यांनी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी असल्याची माहितीही दिली आहे.

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसनं ही निवडणूक लढविण्याची तयारी सुरु करण्यात आल्यामुळे आता ही बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी(दि.२३) कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला भाजपचे माजी खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले, ही निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. पण असे प्रयत्न सुरु होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या महान नेत्यांनी पोटनिवडणूक निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे गाफील न राहता भाजपानं तयारी सुरु केली आहे असंही पाटील यावेळी म्हणाले.

पाटील म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीसाठी एकूण सात जण इच्छुक आहे. पण कोणत्याही उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे कोअर कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांबाबतचा निर्णय भाजपची कोअर कमिटी घेईल. त्यानंतर दिल्लीतून शिक्कामोर्तब करण्यात आलेल्या उमेदवारासाठी काम करणार आहे. आमच्या उमेदवाराची घोषणाही दिल्लीतून होते गल्लीतून होत नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

तसेच ज्या नावावर दिल्लीतून अंतिम होतं त्या उमेदवारासाठी एकदिलानं काम केलं जातं. मात्र, उमेदवार ठरेपर्यंत भाजपचं कमळ हे चिन्हच उमेदवार म्हणून असल्याचा निर्धार करुन आम्ही या दोन्हीही निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे कोअर कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे असेही पाटील यावेळी म्हणाले.