येडियुरप्पांचा सरकार स्थापनेचा दावा, आज संध्याकाळी शपथविधी

0
586

बंगळूर, दि. २६ (पीसीबी) – कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चे बांधणीला वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आहे. यावेळी येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

येडियुरप्पा यांना १०५  आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र त्यांनी राज्यपालांकडे सोपवले. दरम्यान, येडियुरप्पा हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे करतील. त्यानंतर आज संध्याकाळी येडियुरप्पा यांचा शपथविधी होणार आहे.

कर्नाटक मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह फक्त ३४ मंत्र्यांचा समावेश होऊ शकणार आहे. मात्र, भाजप आमदारांपैकी ५६ ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे असून त्याशिवाय १५ बंडखोर आमदारांपैकी काही जण महत्त्वाची पदे मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजप व बंडखोर आमदारांमधील ज्यांना मंत्रीपदे मिळणार नाहीत ते येडीयुरप्पा यांच्यासाठी आगामी काळात मोठी डोकेदुखी ठरू शकतात.

कर्नाटकात कोणीही सरकार स्थापन केले, तरी ते स्थिर राहू शकणार नाही, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले होते. त्यामुळे येडीयुरप्पा यांना सरकार टिकवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.