राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळली; पोटनिवडणुकीबाबत आमदार बनसोडे यांची वेगळीच भूमिका

0
585

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली पोटनिवडणूक लढविण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उफाळल्याचे चित्र समोर आले आहे. पोटनिवडणूक ही आगामी महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट आहे. त्यामुळे निवडणूक लढवलीच पाहिजे अशी भूमिका शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह चिंचवडमधील इच्छुकांनी घेतली असताना राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. जगताप कुटुंबातील उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी  दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस कमालीचे सक्रिय झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केले आहे. जगताप हे पक्षप्रमुख शरद पवार अथवा अजित पवार यांच्यावर नाराज होऊन भाजपा मध्ये गेले नाहीत. त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध करावी.

लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केल आहे.
नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, विधानपरिषद आमदार अशी विविध पद त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सांभाळली. जगताप हे पक्षप्रमुख शरद पवार अथवा अजित पवार यांच्यावर नाराज होऊन भाजपा मध्ये गेले नाहीत. त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. चिंचवड मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्याचा कालावधी दोन वर्षाचा असणार आहे. या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील सदस्यालाच भाजपाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
कालावधी कमी असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात यावी. पोटनिवडणूक लढविण्याबाबत वरिष्ठ पातळींवर निर्णय झाल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यालाच संधी देण्यात यावी, असेही आमदार बनसोडे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत संभ्रम –
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा बैठकांंना कायम अनुपस्थित राहणाऱ्या आमदार बनसोडे यांच्या पक्ष विरोधी भूमिकेमुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कोणत्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा बिनविरोध होऊ द्यायची नाही, घड्याळ चिन्हावरच लढायचे असा ठराव गुरुवारी (दि.२०) पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला आणि आता आमदारच म्हणतात बिनविरोध करायची. आमदार बनसोडे यांच्या भाजपला साथ देणाऱ्या भूमिकेमुळे त्यांच्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.