उध्दव भाऊंच्या काळात अजानच्या मुद्यावर राज ठाकरे रस्त्यावर उतरले होते, आता काय झाले ???

0
198

बुलढाणा, दि. ९ (पीसीबी) : मशिदीवरील भोंग्यावरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. उद्धव भाऊंच्या काळात अजानच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मैदानात उतरले होते. आता काय झाले? असा सवाल करतानाच मित्रांचे सरकार आलंय. आता कधी आंदोलन करणार हे त्यांना विचारा; असा टोला प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. तोगडिया यांच्या या सवालावर राज ठाकरे आता काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजाण आणि लाऊडस्पीकरबाबत राज ठाकरेंना विचारा काय झालं ते…? आता त्यांच्या मित्रांचं सरकार आलं आहे, त्यांना विचारा की कधी आंदोलन करून अजाण आणि लाऊडस्पीकर बंद करणार आहात..? उद्धव भाऊंच्या काळात तर मैदानात आले होते. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आंदोलन केलं तर मी त्यांच्या सोबत राहील, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही महाराष्ट्रातील राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. महाराष्ट्रात औरंगजेबावर प्रेम करणारे छूट भैया अनेक आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या जन्मगावी जावं. मुस्लिम लोकसंख्या वाढू नये यासाठी कायदा बनवावा. हिंदूंनी तर लोकसंख्येवर नियंत्रण केले आहे, असं तोगडिया म्हणाले.

रामदेवबाबांचं समर्थन
मुसलमान पाच वेळा नमाज अदा करूनही चुकीचं काम करतात, रामदेव बाबांच्या विधानाचं तोगडिया यांनी समर्थन केलं. बाब रामदेव चुकीचं बोलत नाहीत. लव्ह जिहादच्या कायद्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गरज पडल्यास भेटेल. गुजरात आणि हरयाणामध्ये लव्ह जिहाद कायदा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा कायदा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता. पण उशीर झालाय, असंही ते म्हणाले.

कलम 370 हटवूनही काश्मीरमधील हिंदू सुरक्षित नाही. यावर केंद्राने कडक पावल उचलली पाहिजेत. काश्मीर खोऱ्यातील सर्व तालिबानी मदरसे, मशीद वर बंदी घालायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते करतील अशी मला आशा आहे, असंही ते म्हणाले.