तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 20 हजारांच्या आसपास पोहोचण्याची भीती

0
373

तुर्की, दि. ८ (पीसीबी) – तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे आतापर्यंत 8000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये भूकंपामुळे 5,894 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 34,810 लोक जखमी झाले आहेत. तसेच, बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियामध्ये 1,220 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर सीरियात सरकारच्या ताब्यात असलेल्या भागांत 812 लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये भूकंपामुळे सुमारे 6000 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सीरियातील 400 इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या, तर 1220 हून अधिक इमारतींचे नुकसान झालं आहे.

डब्ल्यूएचओनं तुर्की आणि सीरियामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओनं तुर्की आणि सीरियामध्ये 20 हजारांहून अधिक लोक मारले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इतकंच नाहीतर दोन्ही देशांतील 2.3 कोटी लोकांना याचा फटका बसू शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे
तुर्कीमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. अशा परिस्थितीत बचाव कार्यात मोठी अडचण येत आहे. एवढंच नाही तर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं लँडिंग करणंही अशक्य आहे. अशा परिस्थितीत सर्व मदत रस्ते मार्गाने बाधित भागांत पोहोचत आहे. तुर्की-सीरिया कॉरिडॉरही भूकंपामुळे उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यानं सीरियापर्यंत मदत पोहोचवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.

तुर्कीनं सरकारकडून इमारतींचं शेल्टर होममध्ये रुपांतर
तुर्कीमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. येथील सर्व शाळा 13 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर सर्व सरकारी इमारतींना शेल्टर होम बनवलं गेलं आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रजब तय्यब एर्दुगन यांनी सांगितलं की, आतापर्यंत 84 देश आणि 14 आंतरराष्ट्रीय संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. केवळ तुर्कीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ही मोठी आपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तुर्कीमध्ये 10,000 कंटेनरमध्ये शेल्टर्स बनवण्याची तयारी सुरू आहे.

7.8 तीव्रतेच्या भूकंपानं तुर्की हाहा:कार
तुर्कीमध्ये सोमवारी पहाटे 04:17 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू गझियानटेपजवळ होता. हे सीरिया सीमेपासून 90 किमी अंतरावर आहे. अशा स्थितीत सीरियातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्केही जाणवले. तुर्कीमधील हा 100 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचं सांगण्यात येत आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपानंतर तुर्कीत 77 आफ्टरशॉक बसलेत. यापैकी एक भूकंप 7.5 रिश्टर स्केलचा होता. तर तीन धक्के 6.0 रिश्टर स्केलपेक्षा जास्त होते