राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची पाठ

0
528

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याच्या निषेधार्थ पिंपरी चौकात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाकडे अनेक आजी-माजी नगरसेवक, माजी आमदार व भावी आमदार म्हणाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे राजकीय वर्तळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्य व केंद्र सरकारने ईडीचा वापर करून श्री शरद पवार यांच्यावर सुडबुद्धीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने करत राज्यभर आंदोलन केले. पिंपरी चिंचवड शहरातही आज आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाकडे अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. राज्यात व पिंपरी चिंचवड महापालिकेत १५ वर्षे सत्तेवर तसेच महापालिकेत ३६ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला आंदोलनाला गर्दी जमवता आली नसल्याने शहरात पक्षाची मोठी पडझड झाली आहे. असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

विधानसभेच्या तिकीटासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांनीही या आंदोलनाला दांडी मारली. आपल्या पक्षाच्या सर्वेसर्वा नेत्यासाठीच्या आंदोलनाला हे राजकीय पुढारी येऊ शकत नसतील तर सर्व सामान्यांच्या हक्कासाठी काय उभे राहणार. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत ताळमेळ राहिला नसल्याचे बोलले जात आहे.