पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – येत्या काही दिवसात पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. विधानसभेची पोटनिवडणूक लढविली तर निश्चितपणे राष्ट्रवादीचा विजय होवू शकतो. त्यामुळे पोटनिवडणूक राष्ट्रवादीने लढवावी आणि तीही पक्षाच्या चिन्हावर लढवावी असे साकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना घातले. त्यामुळे आता राष्ट्रवादी पोटनिवडणूक लढविणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिका-यांची शुक्रवारी एक बैठक झाली. त्यात पोटनिवडणूक लढविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पक्षश्रेष्टींची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) शहरात आलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची स्थानिक पदाधिका-यांनी भेट घेतली. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे यांच्यासह संजोग वाघेरे, मयुर कलाटे, विक्रांत लांडे आदी उपस्थित होते. याशिवाय मागीलवेळी राष्ट्रवादीच्या पाठिब्यांवर अपक्ष लढलेले राहुल कलाटेही उपस्थित होते.
शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”चिंचवडच्या पोटनिवडणुकीसंदर्भात शुक्रवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली. त्यामध्ये चिंचवडची पोटनिवडणूक राष्ट्रवादीने लढवावी असे स्थानिक पदाधिका-यांचे सर्वांचे मत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे”.
”साहेबांना आमचे मत सांगितले आणि मागणीचे पत्र दिले आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पक्षाच्या निर्णयासोबत सर्व इच्छुक राहतील. परंतु, येत्या काही दिवसात महापालिकेच्या निवडणुका आहेत. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. निवडून येतील अशी क्षमता असलेले उमेदवार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल याची सर्वांना खात्री आहे. पोटनिवडणूक लढविली तर निश्चितपणे राष्ट्रवादीचा विजय होवू शकतो”, असा आशावाद गव्हाणे यांनी व्यक्त केला.
”निवडणूक लढविण्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होईल अशा प्रकारची माहिती मिळाली आहे. अजितदादा, जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. साहेबांनाही आमची भूमिका सांगितली आहे. सकारात्मक निर्णय होईल अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. 2019 ला सर्वांनी मिळून एक उमेदवार दिला होता. याबाबत विचारले असता गव्हाणे म्हणाले, यावेळी उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. तशी मागणी पक्षाकडे केली आहे. निवडणूक बिनविरोध होण्याबाबत आमदार अण्णा बनसोडे दुहेरी बोलले आहेत. पक्षाचे सर्व नेते, जो काही निर्णय घेतील. त्यासोबत आमदार बनसोडे राहतील”, असा विश्वास गव्हाणे यांनी व्यक्त केला.