नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत थकलेले आणि घाबरलेले दिसले, अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) लोकसभेत केली. मोदी राफेल जेट प्रकरणात लोकसभेमध्ये येऊन उत्तर देण्यास घाबरत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावर राहुल गांधी यांचे भाषण चालू असताना भाजप खासदारांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. सभागृहात ‘गांधी परिवार चोर है’, ‘मां बेटे चोर है’, अशा घोषणा भाजप खासदारांनी दिल्या.
या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी. चौकशीत ‘दूध का दूध’ होऊन जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले. संरक्षण कराराचा तपास करणे हे न्यायालयाचे काम नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. परंतु, संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशी करू नये, असे न्यायालयाने कधीच म्हटलेले नाही, असे सांगून राफेल कराराची जेपीसीमार्फत चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली.