पुणे, दि. २२ (पीसीबी) – पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाची तोंडावर उशी दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात आज (शनिवार) पहाटे उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जान्हवी अमित कांबळे (वय २२) आणि शिवांश अमित कांबळे (वय २) असे या मायलेकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यात जान्हवी कांबळे यांचे पती अमित कांबळे कार्यरत आहेत. ते रात्रपाळीच्या ड्यूटीवर गेले होते. त्यानंतर जान्हवी कांबळे यांनी त्यांच्या दोन वर्षीय मुलगा शिवांश याच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, जान्हवी यांच्या माहेरच्या लोकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. जान्हवी यांचे पती आणि सासरे हे पोलीस दलात नोकरीला आहेत. तसेच सासू सुजाता नेहमी जान्हवीला त्रास देत होती. त्यामुळेच या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जान्हवी हिने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात अमित तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. मात्र, मला वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव आहे. माझी सासू सुजाता माझा सतत छळ करते, असे या सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे. या प्रकारामुळे अमित यांना धक्का बसला आहे.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.