‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ नाव वगळा

PCB Admin
3 Min Read

संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रविण कदम यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना तहसिलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या नावाने एका चित्रपटाची निर्मिती व प्रसिद्धी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर चित्रपटाच्या शीर्षकाबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम, संघटक वैभव गजधने, विनोद माने, चिंचवड विभागाध्यक्ष श्याम पाटील आदिंनी निवेदनात म्हटले आहे.
शिवराय, फुले, शाहू ,आंबेडकरांच्या महाराष्ट्रात खरात सारखी भोंदू विकृती निर्माण होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.या माध्यमातून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विकृती पुन्हा घडू नयेत म्हणून समाज जागृती आवश्यक आहे. या विषयावर अशी निंदनीय घटना पुन्हा घडू नये म्हणून समाज जागृती व प्रबोधन करण्यासाठी चित्रपट निर्माण होत असेल तर निश्चितच स्वागत आहे .परंतु महाराष्ट्र हा शब्द चित्रपटाच्या पाठीमागे चिटकवणे हा महाराष्ट्राचे पवित्र विचार व अस्मितेचा अपमान आहे.
महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याचा, राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाचा, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समतेच्या विचारांचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक लोकशाहीचा गौरवशाली वारसा असलेली भूमी आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे, समाजसुधारकांची भूमी आहे आणि परिवर्तनवादी विचारांची भूमी आहे. या भूमीने जगाला स्वाभिमान, समता, न्याय, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला आहे.
‘महाराष्ट्र माझा’ असे अभिमानाने म्हणणाऱ्या कोट्यवधी मराठी जनतेसाठी महाराष्ट्र हे नाव स्वाभिमान, शौर्य, सामाजिक परिवर्तन, प्रबोधन आणि मानवतावादी विचारांचे प्रतीक आहे.
अशा परिस्थितीत एखाद्या विशिष्ट गुन्हेगारी व लैंगिक शोषणाच्या विकृती आणि किळस वाण्या प्रकरणाशी संबंधित चित्रपटाला ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ असे नाव देऊन महाराष्ट्र या राज्याच्या नावाची सांगड घालणे हे अनावश्यक, आक्षेपार्ह आणि राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेच्या दृष्टीने अनुचित असल्याचे आमचे मत आहे.
चित्रपट निर्मितीचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे. मात्र, त्या स्वातंत्र्याचा वापर करताना एखाद्या राज्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विचार होणेही तितकेच आवश्यक आहे.
त्यामुळे आमच्या पुढील मागण्या आहेत :
१) ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाच्या शीर्षकाचा तातडीने “महाराष्ट्र” हे नाव वगळून करण्यात यावा.
२) चित्रपटाच्या कथानकाला महाराष्ट्र हे नाव जोडण्याचा खोडसाळपणा तपासण्यात यावा.
३) ⁠महाराष्ट्र राज्याच्या नावाचा अनावश्यक वापर टाळून चित्रपटाचे पर्यायी शीर्षक निश्चित करण्याचे निर्देश संबंधित निर्माते व दिग्दर्शकांना द्यावेत.
४)या निवेदनावर केलेल्या कार्यवाहीची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावी.
महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचा प्रश्न लक्षात घेऊन या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या दुष्परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. या निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनत केली आहे.

Share This Article