सायन्स पार्कमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञानाचाचार दिवसीय महोत्सव – ‘ॲस्ट्रोफेस्ट २०२६’

PCB Admin
2 Min Read

पिंपरी, दि. २७ – सायन्स पार्क व तारांगण यांच्या वतीने, आयुका आणि ज्योतिर्विद्या परिसंस्था, पुणे यांच्या सहकार्याने ‘ॲस्ट्रोफेस्ट २०२६ – आकाशवेध २०२६’ या चार दिवसीय खगोलशास्त्र व अवकाश विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
‘खगोलशास्त्राचा शोध, सहकार्यातून नवी प्रेरणा’ ही या महोत्सवाची संकल्पना असून, भारताच्या ब्रिक्स- BRICS २०२६ उपक्रमांतर्गत खगोलशास्त्र विषयक विशेष प्रदर्शन हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल. खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच विद्यार्थी आणि तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा व आवड निर्माण करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
या महोत्सवात खगोलशास्त्र विषयक प्रदर्शने, प्रात्यक्षिके, कार्यशाळा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून अवकाशविश्वाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. खगोल छायाचित्रण, आकाश निरीक्षण, इन्फ्लेटेबल डोम तारामंडल, उपग्रहांचे थेट प्रात्यक्षिक, वॉटर रॉकेट प्रात्यक्षिके, एरोमॉडेलिंग कार्यशाळा, ३D मून लॅम्प निर्मिती आणि मंगळ रोव्हर अडथळा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
विद्यार्थ्यांसाठी अवकाश संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा, खगोलशास्त्र विषयक चित्रकला स्पर्धा आणि खगोल विज्ञान प्रश्नमंजुषा यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता दाखवण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, तज्ज्ञांची विशेष व्याख्याने, विज्ञान प्रात्यक्षिके आणि तारांगण शो यांचाही आनंद घेता येईल.
महोत्सवात लोकप्रिय विज्ञान व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विज्ञानकथा चित्रपटाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रेक्षकांसाठी हा महोत्सव ज्ञानवर्धक आणि मनोरंजक ठरणार आहे.
‘ॲस्ट्रोफेस्ट २०२६ – आकाशवेध २०२६’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना विश्वाविषयी जाणून घेण्याची, अवकाश विज्ञानातील नवनवीन संकल्पना समजून घेण्याची आणि खगोलशास्त्राबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणाचा प्रयत्न आहे.
डॉ. श्रद्धा खंपरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण, या ‘ॲस्ट्रोफेस्ट २०२६ – आकाशवेध २०२६’ या महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका आहेत.

या विज्ञान आणि ज्ञानाच्या उत्सवात विद्यार्थी, पालक, खगोलशास्त्रप्रेमी आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अवकाशविश्वाचा अनोखा अनुभव घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक श्री. प्रवीण तुपे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share This Article