रक्तदानातून रुग्णसेवेला हातभार; १०४ नागरिकांचे योगदान
पिंपरी, दि. १४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वायसीएम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वायसीएम रुग्णालयातील चाणक्य हॉल येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण १९५ जणांनी नोंदणी केली, त्यापैकी १०४ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. यामध्ये ८५ पुरुष आणि १९ महिला रक्तदात्यांचा समावेश होता.
महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भवसार आणि नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर पार पडले.
रक्तदान हे गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये नियमित रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी महापालिकेच्या कुटुंबकल्याण विभागाचे आणि वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाचे विशेष सहकार्य लाभले. रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता तायडे आणि डॉ. हर्षदा बाविस्कर यांनी शिबिराच्या नियोजनात व अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले. संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे या उपक्रमासाठी विशेष योगदान लाभले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना रक्तदानासह विविध आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून निरोगी समाजाच्या निर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
……
कोट:
“रक्तदान हे सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि गरजू रुग्णांना मदत करण्याचे प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा आणि अशा आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
…..

