
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बोनस, ग्रॅज्युटी, विमा, समान काम समान वेतनासह विविध मागण्या साठी कामगार मेळाव्यात कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आक्रमक; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक
पिंपरी (प्रतिनिधी) ५ ऑक्टोबर २०२६ : कंत्राटी, कायम व हंगामी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती कामगारनेते तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.त्यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे येथे(दि.४) जगद्गुरु संत तुकाराम महाराज येथील सभा मंडपात भव्य कामगार मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.या मेळाव्यात कंत्राटी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सन २०२५-२६ चा बोनस कायद्यानुसार दिवाळीपूर्वी देऊन सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व बोनस देण्यात यावा. तसेच सफाई कर्मचारी व नर्सेस यांना पाच लाख रुपयांपर्यंतची विमा पॉलिसी देऊन त्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनाही लाभ मिळावा. स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित केलेल्या किमान वेतन दराप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन न देणाऱ्या व त्यांच्या वेतनाचे शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून कर्मचाऱ्यांना कायदेशीर वेतन देण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४५० चौरस फुटांचे घर उपलब्ध करून द्यावे.तसेच औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय आणि एनजीटीच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना आवश्यक आरोग्य व सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत. कर्मचाऱ्यांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचारही करावेत. महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार “समान काम समान वेतन देण्यात यावे” म्हणजेच महापालिकेतील परमनंट कर्मचाऱ्यांना जे वेतन आहे तेच वेतन कायद्यानुसार सर्व विभागांमधील कर्मचाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी मेळाव्यातून शासनाकडे केली आहे.
या मागण्यांबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना संबंधित सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाच्या संबंधित विभागांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने लेखी निवेदन देण्यात येणार आहे.दरम्यान, या मागण्यांबाबत अपर कामगार आयुक्त, पुणे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन अपर कामगार आयुक्त श्री. अभय गीते यांनी संघटनेला दिल्याचे कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले.
कामगारांच्या मागण्यांबाबत संघटनेची पुढील दिशा काय असेल, याबाबतही मेळाव्यात उपस्थित कंत्राटी, कायम व हंगामी कर्मचाऱ्यांना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी मार्गदर्शन केले.

