पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ब्राम्हण संघाचा भाजपला इशाराअभ्यासू व समाजाभिमुख व्यक्तीला संधी न देणे ही चूक ठरू शकतेडॉ. सचिन बोधनी यांचे पत्र

PCB Admin
3 Min Read

पुणे, दि. ५ : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मिलिंद संपगावकर यांच्यासारख्या सुशिक्षित, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तीचा विचार न होणे ही भारतीय जनता पक्षाची मोठी चूक ठरू शकते, अशी भूमिका समस्त ब्राह्मण संघाचे डॉ. सचिन बोधनी यांनी व्यक्त केली आहे.
प्रसिध्दीपत्रात डॉ. बोधनी म्हणतात, पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी पदवीधर मतदारसंघासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्राचा अभ्यास असलेल्या व्यक्तींना संधी मिळणे अपेक्षित आहे. मिलिंदजी संपगावकर यांचे सामाजिक कार्य, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि समाजाशी असलेला संवाद लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीचा गांभीर्याने विचार व्हायला हवा होता, असे डॉ. बोधनी यांनी म्हटले आहे.

“मिलिंद संपगावकर यांना केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून डावलले गेले का?” हा प्रश्न उपस्थित करताना डॉ. बोधनी म्हणाले की, हा प्रश्न कोणत्याही एका व्यक्तीपुरता किंवा केवळ ब्राह्मण समाजापुरता मर्यादित नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ब्राह्मण समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाच्या संधी कमी होत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे. या भावनेची भारतीय जनता पक्षाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

निवडणुकीत जातीय समीकरणांचा कोणताही संबंध नाही, असे म्हणणे वास्तवाकडे दुर्लक्ष करणारे ठरू शकते. विविध समाजघटकांच्या राजकीय अपेक्षा आणि मतदानाचे सामाजिक समीकरण निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही समाजाधारित राजकीय अपेक्षांचे महत्त्व आपण पाहिले आहे. त्यामुळे या वास्तवाचा राजकीय पक्षांनी वस्तुनिष्ठपणे विचार करणे गरजेचे आहे.

डॉ. बोधनी पुढे म्हणाले की, “आमचा आग्रह कोणत्याही एका व्यक्तीच्या नावासाठी किंवा केवळ ब्राह्मण उमेदवारासाठी नाही. आमचा प्रश्न प्रतिनिधित्वाच्या समान संधीचा आहे.” ब्राह्मण समाजातील अभ्यासू, सक्षम आणि समाजाभिमुख व्यक्तींना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे राजकीय संधी मिळायला हव्यात.

ब्राह्मण समाजाने केवळ ब्राह्मणबहुल भागातूनच नेतृत्व मिळावे किंवा उमेदवारी मिळावी, अशी मागणी करणे योग्य नाही. उलट, ब्राह्मण समाजाने अनेक मतदारसंघांमध्ये इतर समाजातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना निवडून आणले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजालाही कोणत्याही मतदारसंघातून व्यापक समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी.

“निवडून आलेला प्रतिनिधी हा केवळ आपल्या समाजाचा नसतो; तो संपूर्ण मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो,” असेही डॉ. बोधनी यांनी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध समाजघटकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सर्व समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे उमेदवाराची जात न पाहता त्याची गुणवत्ता, क्षमता, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशक नेतृत्व यांचा विचार होणे आवश्यक आहे.

ब्राह्मण समाज हा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी जोडलेला मतदारवर्ग आहे. त्यामुळे या समाजाच्या राजकीय अपेक्षांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. विशेषतः पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात पदवीधर मतदारसंघासाठी अभ्यासू आणि समाजाभिमुख ब्राह्मण उमेदवाराचा विचार करणे हे व्यापक सामाजिक प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने योग्य ठरले असते, असे डॉ. बोधनी यांनी नमूद केले.

भारतीय जनता पक्षाने या विषयाचा गांभीर्याने विचार करावा आणि आगामी निवडणुकांमध्ये गुणवत्तेसोबतच सर्व समाजघटकांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा समतोल साधावा, ही आमची स्पष्ट आणि सातत्यपूर्ण मागणी राहील.

— डॉ. सचिन बोधनी
समस्त ब्राह्मण संघ

Share This Article