नमस्कार मित्रांनो ! उज्जैन येथे नुकत्याच झालेल्या युवा धर्म संसदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानाच्या इंग्रजी भाषेतील सारांशात त्यांनी केलेले एक अत्यंत महत्त्वाचे विधान मी वाचले – “Dharma does not bind, it liberates.” पुढे भागवत साहेब म्हणतात, “It is a guiding discipline, shaping conduct, responsibility, social harmony and progress, and not limited to religious rituals.” भारतीय युवकांना प्रगल्भतेने पुढे नेण्यासाठी म्हणून हे विधान खूपच महत्त्वाचे व समयोचित आहे, याबाबत दूमत होऊ नये. याच भाषणात त्यांनी ‘Religion’ या बंदिस्त संकल्पनेपेक्षा ‘धर्म’ ही संकल्पना कशी विस्तृत आहे, याचा परामर्श घेतला आहे. सैद्धांतिक चर्चेसाठी ही सारी विधाने उपयुक्त व महत्त्वाची आहेतच. परंतु याच विधानांचा खोलात जाऊन आपण अभ्यास करु लागतो तेव्हा तपशील आणि वस्तुस्थिती यामधील सर्वसामान्यांना वाटणारा वैचारिक गोंधळ हा दृग्गोचर होऊ लागतो.
“धर्म हा मुक्ती प्रदान करणारा असतो.” ही मुक्ती कशापासून ? आजच्या भारतीय धार्मिक व्यवहारातील अनेक प्रचलित प्रतिके, प्रतिमा, प्रक्रिया व प्रकल्प अभ्यासले तर ते पूर्ण मुक्तीकडे नेणारे वाटत नाहीत. एक सामान्य व सुपरिचित उदाहरण घेऊयात. एकलव्याचा अंगठा घेणारे आणि द्रौपदीची विटंबना मूकपणे पाहणाऱ्या द्रोणाचार्यांच्या नावे आजही शासकीय पुरस्कार दिले जातात. कोणताही धर्म हा नीतीमत्तेला सदैव प्रोत्साहित करणारा असावा. यास्तव एखाद्या व्यक्तीच्या व्यावसायिक कौशल्यापेक्षा तिचे नैतिक उत्तरदायित्व हे निश्चितच खूप महत्त्वाचे ठरते. द्रोणाचार्य पुरस्कारातून तरुणांना हा “नीतीबोध” कसा होणार ? भागवत साहेबांनी “religious rituals” चा उल्लेख केला. हे रिच्युअल्स खोलात जाऊन पाहू गेल्यास श्रद्धा, अंधश्रद्धा आणि तर्क यांच्या गोंधळात आजचा भारतीय तरुण अधिक सापडतो. पाश्चिमात्यांचा जो ‘रिलिजन’ बंदिस्त आहे असे आम्ही म्हणतो त्यानेच काही शतकांपूर्वी आपल्या प्रजेला स्वतःच्या कालबाह्य रिच्युअल्समधून मुक्त केले. याचमुळे पाश्चिमात्यांनी केलेली बहुतेक संशोधने आम्ही आज वापरतो. इथे मग पुन्हा प्रश्न उपस्थित होतो तो “Spiritual Growth” चा. या संकल्पनेलाच प्रचंड छेद देणारी चातुर्वर्ण्य व्यवस्था आजही कार्यरत आहे. अनेक धार्मिक विषयातील विद्वान या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे आजही प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष समर्थन करताना दिसतात. यातही आघाडीवर आहेत उत्तर भारतीय पट्ट्यातील काही विद्वान ज्यांच्या भौगोलिक क्षेत्रात या अन्यायी व्यवस्थेची मुळे आधी रूजवली गेली. म्हणजे “Dharma liberates” असे म्हणताना या मुक्ती प्रदान करणाऱ्या प्रक्रियेत बाधा आणणारे कालचे – आजचे दुषित लेखन, संबोधन इ. गोष्टी या स्पष्टपणे नष्ट करायला हव्यात. फक्त उदात्त संकल्पना मांडण्याने उद्देश स्पष्ट होतो, परंतु त्या उद्देशाची निर्दोष अंमलबजावणी करणाऱ्या प्रक्रिया या सामान्यजनांना समजतील अशा प्रकारे मांडायला व उपलब्ध करुन द्यायला हव्यात.
याबाबतीत इथे कृष्णाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. कृष्णाने अंधश्रद्धेवर प्रहार करताना पर्जन्यासाठी केली जाणारी इंद्राची पूजा बंद करवली. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध करण्यासाठी त्याने क्षत्रिय, वैश्य व आदिवासी समाजातील स्रियांसोबत विवाह केले. स्रियांच्या गौरवाबाबत अगदीच उदासीन असणाऱ्या पितामह भिष्माचाही त्याने वध करविला. ज्या उत्तर भारतीय आडव्या पट्ट्यात आम्ही आमच्या धार्मिक श्रद्धांना उजाळा देण्यासाठी जातो त्या पट्ट्यात आजही जातीनिर्मूलन व स्री – गौरवाबाबत खेडोपाडी बरीच उदासीनता दिसून येते. किंबहुना याच पट्ट्यातील काही तथाकथित संस्कृतीरक्षक “संस्कृती”चा चुकीचा अर्थ लावताना व तशी वादग्रस्त विधाने करताना दिसतात. या पट्ट्यात ना खरी Spiritual Growth दिसते, ना Material Advancement. मग “Dharma liberates” असे होताना इथे दिसत नसल्याने येथील मंडळी शिक्षण, रोजगार व अन्य प्रबोधनासाठी दक्षिण भारतात येतात. धर्माने सामान्यजनांना नेहमीच्या वेदनांपासून मुक्त करायचे असेल तर नीतीमत्तेच्या चौकटीतले अर्थकारण व्हायला हवे. “भूके पेट भजन नहीं होई” या प्रचलित उक्तीनुसार भारतीय गरीब आधी आपल्या प्राथमिक आर्थिक गरजा भागवू शकले तर ते मानसिकदृष्ट्या स्थिरचित्त होतील नि संस्कृती व धर्म यांमधील संबंध समजून घेऊ शकतील. म्हणजे गरीबांची ” Material Advancement” झाल्याशिवाय “Spiritual Growth”ला परिपूर्णता येणार नाही.
“जे उत्तम आहे ते धारण करु” असे धार्मिक संदर्भ देताना उत्तमतेची सर्वांगीण व्याख्या करावी लागेल. कोणताही समाज हा चतुरस्त्रपणे प्रगल्भ होण्याच्या चार कसोट्या असतात – बौद्धिक संपदा, आर्थिक संपन्नता, सामाजिक समता व सांस्कृतिक आणि अध्यात्मिक आनंद. या चार स्तंभांमधील संतुलन बिघडले की समाज बिघडतो नि मग राष्ट्र दुर्बळ बनते. हे संतुलन काही पश्चिमी देशांनी घालवले नि म्हणून त्यांच्या अर्थव्यवस्था आज अडचणीत सापडलेल्या आहेत. यांच्याच तुलनेत स्वतःची पौर्वात्य संस्कृती सांभाळणारा चीन अनेक मापदंडांवर बराच अग्रेसर ठरला आहे. हे मान्य की लोकशाही मुल्ये व आर्थिक प्रगती यांचे संतुलित मिश्रण हे सर्वोत्तम असते. परंतु याच लोकशाही मुल्यांच्या अंमलबजावणीबाबत मग आज आमची “Spirituality” कुठे कमी पडते ? लोकशाहीच्या उदात्त चौकटीत खरेतर भारतीय समाज हा चारही मापदंडांवर पूर्णांशाने उन्नत व्हायला हवा, पण तो तसा होत नाहीय. याची कारणे आम्हाला माहीत आहेत. Spirituality च्या आवरणाखाली अवडंबरे, अंधश्रद्धा, कर्मकांडे इ. गोष्टींमध्ये जो समाज रुतलेला असतो तो जगाचे मार्गदर्शन कसे करणार ? आमच्या महत्वाकांक्षांचे मापदंड (Benchmarks) हे खूप मोठे असतात पण या महत्वाकांक्षांवर काम करण्यासाठी जी भरारी घ्यायची असते ती “Dharma liberates” या उक्तीवर आधारलेली असायला हवी. कृष्ण आणि शिवराय हे दोघेही आपापल्या काळात रयतेला प्रगल्भ समाजाकडे नेणारे पथ – प्रदर्शन स्वतःच्या आचरणातून करायचे. अशा आचरणामुळे सैद्धांतिक संदिग्धता रहात नसे.
भागवत साहेबांनी “Social harmony and progress” या महत्वाच्या अपेक्षेचा उल्लेख आपल्या भाषणात केला. या दोन्ही गोष्टी नीटपणे शक्य होतील जर आम्ही सर्व क्षेत्रांमधील वर्चस्ववादामधून आमची मुक्तता करु शकू. प्रथम जैन तिर्थंकर ऋषभनाथांचा “अनेकांतवाद” व तथागत गौतम बुद्धानी मांडलेला “विवेकवाद” या संकल्पना अशा मुक्ततेच्या प्राथमिक वाटा ठराव्यात. धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, भाषिक, शैक्षणिक, राजकीय व वैचारिक वर्चस्ववाद नष्ट केल्याशिवाय “Social Harmony” शक्य नाही. “आम्ही सांगू ती प्रतिके, प्रतिमा, प्रक्रिया व प्रकल्प हे अंतीम सत्य आहे” हा अट्टाहास वाढताना दिसतो आहे. मग अशा वर्तनातून “Dharma shapes the conduct” ही अपेक्षा कशी पुरी होणार ? आम्ही पाश्चिमात्यांच्या धर्माला “बंदिस्त” समजतो परंतु आमच्या येथील हजारो वर्षांच्या वर्चस्ववादाने नैतिकदृष्ट्या सर्वोत्तम असू शकणाऱ्या धर्माची मुळे कमजोर केली हे प्रांजळपणे मान्य करणार आहोत का ? हा वर्चस्ववाद तर आजही आमच्या कुटुंब व विवाहव्यवस्थेत दिसून येतो. “शिव – पार्वती” हे स्री – पुरूष समतेचे आदर्श उदाहरण असणाऱ्या जोडप्याची अध्यात्मिक आठवण तर आम्ही करतो परंतु या आठवणीचे आचरणात पूर्ण रुपांतर होताना तितकेसे दिसत नाही. इथे टोकनिजमचा आधार घेत आम्ही काही उदाहरणे विषद करतो परंतु अजूनही बराच मोठा समतेचा पल्ला आम्हाला गाठायचा आहे. स्री – पुरुष समानता, मानवीय समानता इत्यादी ‘नीतीबद्ध धर्मा’च्या गोष्टी जोपर्यंत तथाकथित परंपरांच्या आवरणाखाली दाबल्या जातील, तोपर्यंत “Dharma liberates” हे प्रत्यक्षात उतरणार नाही.
आम्ही सारे सिंधू संस्कृतीचे वारसदार. भारतीय उपखंडात ही संस्कृती सर्वदूर पसरलेली. त्या काळातील मेसोपोटेमिया संस्कृतीपेक्षाही ही संस्कृती अधिक प्रगल्भ होती, असे इतिहासकार म्हणतात. या सिंधू संस्कृतीमधील गणराज्ये, गणनायक व गणनायिका आणि गणांमधील सामूहिक सहकार हा वारसा प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे आजही भारतीय बहुजनांकडून थोड्याफार प्रमाणात जपला जातोय, ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट म्हणायला हवी. बहुजनांच्या भारतीय लोककथांमधून कृष्ण व बळीराजा या बहुजननायकांच्या “Public Governance”च्या पुढे येणाऱ्या संकल्पना व शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना या एकच आहेत. भारतीय उपखंडातील प्राचीन काळातील सिंधू संस्कृती ही अनेक तार्किक व अध्यात्मिक प्रगतीच्या क्षेत्रांत पुढारलेली होती. याच पुढारलेपणाचे दर्शन आम्हाला या तीन महापुरुषांच्या तत्त्वज्ञानात्मक बैठकीत दिसून येते. नंतर मात्र चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या वाढत्या प्रभावामुळे आमची ही “spiritual and material maturity” हळूहळू क्षीण होत गेली. सातशे वर्षे मुघल आणि इंग्रज इथे राज्य करु शकले कारण ही ‘maturity’ आम्ही विसरून गेलो होतो. “धर्मो रक्षति रक्षित:” हे तर आमचे प्राणप्रिय घोषवाक्य, परंतु “Liberating Dharma”ची परीपूर्ण व्याख्या आम्ही वर्चस्ववादाच्या सावटाखाली विसरलो. तेव्हा “Dharma does not bind” या सुभाषितावर साधकबाधक चर्चा व्हावी ही अपेक्षा इथे व्यक्त करून हा लेख इथे संपवतो.
—- डॉ गिरीश जाखोटिया.
ईमेल –
girishjakhotiya@gmail.com
Copyright ©️ jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.

