हरित सेतू प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक

bpcauthor
1 Min Read

पिंपरी-चिंचवड प्राधिकरण परिसरातील बहुचर्चित हरित सेतू प्रकल्पावरून शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. प्रकल्पासंदर्भातील नागरिकांचे प्रश्न आणि अडचणी मांडण्यासाठी वारंवार वेळ मागूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुख राजेश किसनराव फलके यांनी केला आहे.

फलके यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत प्राधिकरण परिसरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे. हरित सेतू प्रकल्पातील रस्त्यांची रुंदी, फुटपाथ, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, नागरिकांची गैरसोय तसेच प्रकल्पाची आवश्यकता आणि त्यावरील खर्चाबाबत नागरिकांना प्रशासनाशी थेट चर्चा करायची असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वी दोन वेळा बैठक निश्चित करण्यात आली होती; मात्र दोन्ही बैठका रद्द झाल्याचा दावा फलके यांनी केला आहे. वारंवार बैठक निश्चित करून ती रद्द होणे ही नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची बाब असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

आठ दिवसांत बैठक घेण्याची मागणी
प्राधिकरणवासीयांच्या शिष्टमंडळाला येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसे न झाल्यास स्थानिक नागरिकांशी हरित सेतू प्रकल्पाबाबत थेट चर्चा करण्यासाठी काचघर चौक, सेक्टर क्रमांक २४, प्राधिकरण येथील हनुमान मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

Share This Article