संगीत अकादमीतील सुविधांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा

bpcauthor
2 Min Read

विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना

*पिंपरी, दि. ३ * पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन अकादमीतील विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, प्रशासन अधिकारी दत्ता सूर्यवंशी, संगीत शिक्षक उमेश पुरोहित, समीर सूर्यवंशी, नंदीन सरीन, स्मिता देशमुख, संतोष साळवे, वैजयंती भालेराव, मिलिंद दलाल यांच्यासह विद्यार्थी व संगीतप्रेमी उपस्थित होते.

अकादमीमध्ये संगीत साधनेसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण तसेच प्रशासकीय कामकाजाची माहिती उपमहापौर बाबर यांनी घेतली. विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी अकादमीतील लिफ्ट सुविधेचा प्रश्न, कार्यालयीन कामकाजासाठी लिपिकाची आवश्यकता, मनुष्यबळाची कमतरता तसेच स्वच्छतेशी संबंधित बाबी उपमहापौरांच्या निदर्शनास आणून दिल्या. या प्रश्नांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

संगीत अकादमीमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात संगीताचे शिक्षण व साधना करता यावी, यासाठी उपलब्ध सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. अकादमीतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमहापौर बाबर यांनी दिल्या.

विद्यार्थिनी तेजस्विनी बोळे हिचा गौरव

संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी तेजस्विनी धनंजय बोळे हिचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ‘संगीत विशारद हार्मोनियम’ परीक्षेत प्रथम श्रेणीचे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. यावेळी तिचे अभिनंदन करून पुढील संगीत वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Share This Article