पुणे, दि. ३
हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे बैठक पार पडली.
या बैठकीत परिसरातील वाहतूक कोंडी, रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, औद्योगिक व नागरी विकास, मेट्रो विस्तार तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या प्रमुख मागण्यांवर संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
बैठकीस विभागीय आयुक्त, पुणे; महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA); आयुक्त, पुणे महानगरपालिका; आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका; जिल्हाधिकारी, पुणे; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक; पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी; सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता; पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक; पोलीस आयुक्त, पुणे व पिंपरी-चिंचवड; महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता; भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी; महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हिंजवडी-माण-मरुंजी परिसराचा नियोजनबद्ध आणि गतिमान विकास करताना नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या दृष्टीने विविध विभागांनी परस्पर समन्वयातून काम करून नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

