पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करावेत – उपमहापौर शर्मिला बाबर..

bpcauthor
2 Min Read

शहरातील ज्येष्ठ नागरिकांची उपमहापौर बाबर यांच्याकडे मागणी; अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिले निर्देश…

पिंपरी, दि. ७ – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करण्यात यावेत, या मागणीसाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट घेतली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत उपमहापौर बाबर यांनी ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांची भेट घेतली आणि जलतरण तलाव सुरू करण्याबाबत निवेदन दिले.

यावेळी उपायुक्त पंकज पाटील, ज्येष्ठ नागरिक कैलास तापकीर, डॉ. चंद्रकांत चौधरी, शिवाजी आढाव, प्रमोद शहाणे, राजेंद्र पोतदार, अनिल पवार, मापारी शांतीलाल आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शहरातील सर्व जलतरण तलाव सध्या बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जलतरण हा आरोग्य आणि व्यायामासाठी उपयुक्त असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकडून तलाव लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, पवना धरण १०० टक्के भरले असून शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही सुटला आहे. त्यामुळे जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सर्व १३ जलतरण तलाव पूर्ववत सुरू करण्याची सूचना उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे केली.
उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या सूचनेची अतिरिक्त आयुक्त जंगम यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांनी उपायुक्त पंकज पाटील यांना शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिक, जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे.

जलतरण तलाव सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share This Article