पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी होणार – महापौर रवि लांडगे

bpcauthor
2 Min Read

पिंपरी, दि. ४ – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अधिक सक्षम, व्यवहार्य आणि नागरिकांना दिलासा देणारी पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर तसेच संबंधित अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

बैठकीत यापूर्वीच्या पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणी, त्रुटी, त्यामागील कारणे तसेच त्यावरील उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्थेचे पुनर्नियोजन करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करणे, नागरिकांना सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे, व्यापारी भाग, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख चौकांमध्ये नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उभारणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण करत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा मांडला. तसेच शहराच्या विविध भागांतील पार्किंगची सद्यस्थिती, उपलब्ध जागा, भविष्यातील गरजा आणि नियोजनाबाबत आवश्यक सूचना व प्रस्तावही सादर करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध आणि कार्यक्षम बनविण्यासाठी प्रभावी पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. नागरिकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर करणे आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकाभिमुख आणि व्यवहार्य पार्किंग व्यवस्था उभारावी, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

Share This Article