खंडणी मागणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन

bpcauthor
3 Min Read

दि.०९(पीसीबी)-लोणावळा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अडवून, त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याचा खोटा संशय व्यक्त करत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या खंडाळा पथकातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणातील आरोपींची खात्यांतर्गत सखोल चौकशी देखील केली जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी तत्परता दाखवत ५ आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १३ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

५ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास विमाननगर, पुणे येथील रहिवासी उमेश शर्मा (वय २८) हे आपल्या सहकाऱ्यांसह चारचाकी वाहनाने पर्यटनासाठी लोणावळ्याकडे जात होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मौजे ताजे (ता. मावळ) गावच्या हद्दीत अंबर दिवा लावलेल्या वाहनातील सहा जणांनी पर्यटकांची गाडी थांबवली. आरोपींनी पर्यटकांकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय व्यक्त करून कारवाई करण्याची भीती दाखवली आणि ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच त्यांना जबरदस्तीने तळेगाव दाभाडे परिसरात नेऊन एटीएममधून पैसे काढून देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने चक्र फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यात हायवे ट्रॅफिक ड्युटीवर असणाऱ्या खंडाळा पथकातील पोलीस अंमलदार, होमगार्ड आणि वॉर्डन यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत पोलीस अंमलदार अमोल महादेव ननावरे (वय ३६, रा. खंडाळा), पोलीस अंमलदार तुषार बाळू ढावरे (वय ३३, रा. खंडाळा), होमगार्ड तुषार संजय घाडगे (वय ४१, रा. करंज, ता. मावळ), होमगार्ड किसन कोंडीबा बांबले (वय ३२, रा. पिंपळोली, ता. मावळ) आणि ट्रॅफिक वॉर्डन नितेश दिपक चव्हाण (वय ३२, रा. शिलाटणे, ता. मावळ) या पाच आरोपींना अटक केली आहे. याशिवाय, खंडाळा पथकातील पोलीस अंमलदार अमोल अशोक वायकर याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कर्तव्यावर असताना हायवे ट्रॅफिक नियंत्रणाच्या नावाखाली पर्यटकांना लुटणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या गुन्हेगारी कृत्याची पुणे ग्रामीण पोलीस दलाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी पाठवलेल्या अहवालावरून दोषी पोलीस अंमलदारांवर निलंबनाची तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. या सर्व आरोपींची खात्यांतर्गत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर पावले उचलली जात आहेत.

Share This Article