विवाहसंस्थेचे बदलते स्वरूप : अपेक्षा, पालकत्व आणि समाजाचे आत्मपरीक्षण

bpcauthor
4 Min Read

दि२५(पीसीबी)- विवाह ही भारतीय समाजव्यवस्थेतील केवळ एक सामाजिक प्रथा नाही; ती दोन व्यक्ती, दोन कुटुंबे, दोन संस्कार आणि दोन आयुष्यांना जोडणारी अत्यंत संवेदनशील संस्था आहे. परंतु काळाच्या ओघात विवाहाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलत गेला आणि अनेक ठिकाणी नात्यांपेक्षा निकष, संस्कारांपेक्षा संपत्ती आणि समजूतदारपणापेक्षा प्रतिष्ठेला अधिक महत्त्व दिले जाऊ लागले आहे.

काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाच्या स्थळासंदर्भात एका मुलीच्या वडिलांशी चर्चा सुरू होती. सुरुवातीचे नेहमीचे प्रश्न झाल्यानंतर त्यांनी विचारले, “तुमच्याकडे शेती आहे का?”

हा प्रश्न चुकीचा नव्हता. प्रत्येक पालकाला आपल्या मुलीसाठी सुरक्षित आणि स्थिर भविष्य हवे असते, हे स्वाभाविक आहे. पण त्या क्षणी मनात एक प्रश्न निर्माण झाला, आपण मुलगा-मुलीच्या भविष्यातील आनंदाचा विचार करतो आहोत की एखाद्या व्यवहाराची किंमत ठरवत आहोत?

आज विवाह जुळवताना सर्वप्रथम विचारले जाणारे प्रश्न कोणते असतात? पगार किती? घर किती मोठं? प्रॉपर्टी किती? शेती किती? व्यवसाय किती मोठा? समाजातील प्रतिष्ठा किती?

परंतु फार कमी वेळा विचारले जाते की हा मुलगा समजूतदार आहे का? ही मुलगी जबाबदार आहे का? दोघे एकमेकांचा आदर करतील का? मतभेद आले तर संवाद साधू शकतील का? आयुष्यभर एकमेकांना साथ देतील का?

खरं तर वैवाहिक जीवनाचा पाया मालमत्तेवर नव्हे, तर स्वभाव, संस्कार, विश्वास आणि संवादावर उभा असतो. पैसा आणि प्रतिष्ठा सुखसोयी देऊ शकतात, पण आनंदी संसाराची हमी देऊ शकत नाहीत.

आजची आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे विवाहासाठी वाढत चाललेल्या अवास्तव अपेक्षा. प्रत्येक पालकाला आपल्या मुलासाठी सर्वोत्तम जोडीदार हवा असतो, पण अनेकदा “सर्वोत्तम” शोधताना “योग्य” व्यक्ती दुर्लक्षित होते. रूप, रंग, उंची, नोकरीचे ठिकाण, मालमत्ता, सामाजिक दर्जा आणि अशा असंख्य अटींमुळे अनेक चांगली स्थळे सुरुवातीलाच नाकारली जातात.

या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अनेकदा मागे पडते, मुलगा आणि मुलगी काय विचार करतात?

अलीकडच्या काही घटनांनी समाजाला हादरवून सोडले आहे. पुण्यात चर्चेत आलेल्या केतन अग्रवाल आणि सिया गोयल प्रकरणानेही अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रकरणाचे अंतिम सत्य न्यायालय ठरवेल; मात्र या घटनेने प्रत्येक पालकाला एक प्रश्न विचारण्यास भाग पाडले आहे, आपण आपल्या मुलांशी खरंच संवाद साधतो का?

आपण त्यांना शिकवतो, मार्गदर्शन करतो, त्यांच्यासाठी निर्णय घेतो; पण त्यांच्या मनातील भीती, भावना, प्रेम, अपेक्षा आणि संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न किती वेळा करतो?

आज अनेक तरुण मानसिक तणाव, सामाजिक दबाव आणि भावनिक संघर्षातून जात आहेत. पण पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालल्याने अनेक गोष्टी मनातच दडून राहतात. परिणामी निर्णय घेतले जातात, पण मनं एकत्र येत नाहीत.

“लग्न झाले की सगळं ठीक होईल” हा आपल्या समाजातील सर्वात धोकादायक गैरसमजांपैकी एक आहे. विवाह हा समस्यांचे समाधान नसतो; उलट दोन व्यक्ती मानसिकदृष्ट्या तयार नसतील तर तो समस्यांना अधिक गुंतागुंतीचा बनवू शकतो.

कुणाचाही संसार ही प्रयोगशाळा नाही आणि कुणाचेही मूल हे “लग्नानंतर सुधारेल” म्हणून वापरायचे साधन नाही. चुकीच्या निर्णयाची किंमत अनेकदा दोन व्यक्तींनाच नव्हे तर दोन संपूर्ण कुटुंबांना आयुष्यभर मोजावी लागते.

म्हणून आज गरज आहे ती विवाहसंस्थेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची.

स्थळ पाहताना मालमत्तेपेक्षा माणूस पाहूया. पगारापेक्षा कर्तृत्व पाहूया. प्रतिष्ठेपेक्षा चारित्र्य पाहूया. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाज काय म्हणेल यापेक्षा मुलांच्या आयुष्याचा विचार करूया.

पालक म्हणून आपल्या मुलांवर प्रेम करणे पुरेसे नाही; त्यांना समजून घेणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यांच्या आयुष्याविषयीचे निर्णय घेताना त्यांचा आवाज ऐकणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

कारण शेवटी यशस्वी विवाह हा दोन श्रीमंत घरांचा करार नसतो; तो दोन समंजस मनांचा, दोन विश्वासू व्यक्तींचा आणि दोन संस्कारित कुटुंबांचा सुंदर प्रवास असतो.

समाजाने आता स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची वेळ आली आहे. अन्यथा आपण संपत्तीच्या शोधात चांगली माणसं गमावत राहू आणि प्रतिष्ठेच्या नादात आनंदी आयुष्यांच्या संधी हातातून जाऊ देऊ.

कारण नातं जुळवणं सोपं असतं, पण तुटलेल्या मनांना आणि उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यांना पुन्हा जोडणं फार कठीण असतं.

राजेश पुंडलिकराव थेटे
रा. पुणे व नाशिक
9373322368

Share This Article