जनगणना २०२७ साठी १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू

0
3

नागरिकांनी सहभागी होण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आवाहन

पिंपरी दि.३०(पीसीबी)-देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असलेल्या जनगणना २०२७ प्रक्रियेची पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिक, तसेच शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांना या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा जनगणना प्रक्रियेत अचूक, पारदर्शक व विश्वसनीय माहिती संकलनावर विशेष भर देण्यात येत असून, त्यासाठी स्वयं-नोंदणी (Self Enumeration) या सुविधेला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. ही प्रक्रिया सोपी, जलद आणि सुरक्षित असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यानंतर १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार आहेत. त्या वेळी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

जनगणना ही शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. स्वयं-नोंदणीमुळे नागरिकांचा वेळ वाचतो आणि माहिती अधिक अचूकपणे नोंदवता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या सुविधेचा लाभ घ्यावा. नागरिकांचा सक्रीय सहभाग हा शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आपली जनगणना, आपला विकास या संकल्पनेतून प्रत्येकाने पुढाकार घेत जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे मत उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनगणना २०२७ ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. नागरिकांनी स्वयं-नोंदणीद्वारे पुढाकार घेतला तर माहिती अधिक अचूक आणि विश्वासार्ह मिळेल. प्रत्येक नागरिकाने ही आपली जबाबदारी समजून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मी करतो.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांनी जबाबदारीने सहभागी होऊन अचूक माहिती देणे आवश्यक आहे. हीच माहिती शहराच्या विकासाचा मार्ग ठरवणार आहे.
-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


स्वयं-नोंदणी ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरून प्रशासनाला सहकार्य करावे.
– कुलदीप जंगम,अतिरिक्त आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका