नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे; मुख्य सूत्रधार अजूनही फरार

0
2

दि.२१(पीसीबी)-नाशिकमधील Tata Consultancy Services कंपनीत उघडकीस आलेल्या कथित धर्मांतर आणि छळ प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य सूत्रधार मानली जाणारी एचआर अधिकारी निदा खान अद्याप फरार असून पोलिसांची तीन पथके तिच्या शोधात आहेत.

दरम्यान, पीडित तरुणीच्या जबाबातून संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी रजा मेनन आणि आसिफ अन्सारी यांच्याकडून सतत छळ, अश्लील टिप्पणी आणि अनुचित स्पर्श केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी साडीचा पदर ओढल्याची धक्कादायक घटना देखील पीडितेने सांगितली आहे.

तसेच, आरोपींकडून हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह प्रश्न विचारणे, मानसिक दबाव आणणे आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समोर आले आहे. ऑफिसमधील वातावरण जाणीवपूर्वक अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करून तरुणींना आक्षेपार्ह संदेश पाठवले जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. इंटरनेट पासवर्डही अश्लील किंवा धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारे ठेवले जात असल्याचेही समोर आले आहे. काही आरोपींनी मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याची शक्यता व्यक्त होत असून तपास अधिक गतीने सुरू आहे.

पोलिसांनी आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले असून पुढील तपासासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणामागे संघटित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, फरार आरोपी निदा खानचा शोध लागल्यानंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.नाशिकमधील या घटनेमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.