धक्कादायक! नवरा-सेक्रेटरीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला

2 Min Read

दि.१७(पीसीबी) -पुण्यातील मुंढवा परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भाजपच्या पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष ॲड. संजय सावंत याला त्याच्या कार्यालयातील सेक्रेटरी पूनम दिनेश मुन (वय ३५) यांच्या खुनाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याची पत्नी स्वाती सावंत आणि अल्पवयीन मुलीचाही सहभाग असल्याने त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून सावंत यांच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, संजय सावंत आणि पूनम यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नी स्वाती सावंतला होता. या संशयातून घरात आणि कार्यालयात वारंवार वाद होत होते.

गुरुवारी (१६ एप्रिल) दुपारच्या सुमारास कार्यालयात संजय सावंत, त्याची पत्नी आणि मुलीने मिळून पूनम मुन यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पायांना दोरीने बांधून बॅटने मारहाण करण्यात आली. या क्रूर मारहाणीत पूनम मुन यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून कार्यालयातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, पूनम मुन घरी न परतल्याने त्यांच्या पती उद्धव मुन यांनी शोध सुरू केला. त्यांनी सावंत यांच्या कार्यालयात जाऊन पाहणी केली असता, एक संशयास्पद पोते आढळले. ते उघडून पाहिल्यावर आत पूनम मुन यांचा मृतदेह आढळून आला.

यापूर्वी पूनम घरी न आल्याने कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली.या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

Share This Article