दि.१५(पीसीबी)-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्षात लवकरच नेतृत्वाच्या पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पक्षाचे युवा नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली जाऊ शकते. या निर्णयामुळे पक्षातील त्यांचे स्थान अधिक बळकट होणार असून संघटनात्मक पातळीवर त्यांच्याकडे अधिक अधिकार येतील.
याआधी 2003 साली उद्धव ठाकरे यांना देखील अशाच प्रकारे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यासाठी पक्षाची कार्यकारिणी बैठक बोलावून अधिकृत प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो.
गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरे यांनी संघटनात्मक निर्णयांपासून निवडणुकांपर्यंत सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे पक्षात नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत नव्या पिढीची फळी तयार होईल, असा विश्वास काही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.दरम्यान, संजय राऊत यांनीही या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. “तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देणे आवश्यक आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईबाहेरील निवडणुकांमध्ये चांगले काम केले आहे,” असे ते म्हणाले.
जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर तो उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाची सूत्रे हळूहळू आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याच्या प्रक्रियेची सुरुवात मानली जाईल.महाराष्ट्राच्या राजकारणात या संभाव्य निर्णयामुळे नवा टप्पा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.














































