अमेरिकन फिलॉसॉफी’ संस्थेकडून ‘भीमराव आंबेडकर पुरस्कार’ देण्याची घोषणा

0
4

दि.१४(पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले वैचारिक आणि सामाजिक योगदान लक्षात घेऊन अमेरिकेतील ‘सोसायटी फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी’ (एसएएपी) या तत्त्वज्ञान संस्थेकडून नुकताच ‘भीमराव आंबेडकर पुरस्कार’ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ‘ग्लोबल प्रॅग्मॅटिझम’ या क्षेत्रातील हा पुरस्कार आंबेडकरांच्या नावे देणारी सोसायटी फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी ही पहिलीच अमेरिकन शैक्षणिक संस्था ठरली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच आधुनिक तत्त्वज्ञान या विषयाकडे जागतिक पातळीवर पुन्हा नव्याने पाहिले जावे, या उद्देशाने अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेकडून हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. एसएएपीच्या वार्षिक परिषदेत सादर होणाऱ्या महत्वपूर्ण शैक्षणिक संशोधनाला बाबासाहेबांच्या नावे असणारा हा पुरस्कार दिला जाणार आहे.

यामुळे विविध देशांमधील विचार परंपरांचे आदानप्रदान होणार आहे तसेच अमेरिकन तत्त्वज्ञान आणि आशिया, आफ्रिका व इतर प्रदेशांतील या विषयावरील विचारांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
डॉ. बाबासाहेबांचे विचार हे केवळ भारतासाठी महत्वाचे नसून जागतिक पातळीवरही हे विचार महत्वाचे आहेत. बाबासाहेब हे फक्त समाजसुधारक नव्हते तर तत्त्वचिंतकही होते, असे संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीपत्रात नमूद करण्यात आले आहे. ‘भीमराव आंबेडकर पुरस्कारा’ मुळे बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असून यातून ‘ग्लोबल प्रॅग्मॅटिझम’ या क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरच्या संशोधकांना प्रेरणा मिळणार आहे.