दि.१२(पीसीबी) -ज्येष्ठ गायिका आशा भोसले (वय-९३) यांचं निधन झालं. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची व्हर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत. १९५० पासून तब्बल १२ हजारावर गाणी गायली. सातवेळा सर्वोत्कृष्ठ गायिकेचा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थामुळे तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत माहिती दिलेली. तिनं सांगितलेलं की, “माझ्या आजीला चेस्ट इंफेक्शन आणि खूपच अशक्तपणा आलाय… त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय… कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा, तिच्यावर उपचार सुरू आहेत… ती लवकरच बरी होईल…”
ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
प्रकृती अस्वास्थामुळे आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज गायिकेच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अशातच ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.











































