रणरणत्या उन्हात तो अनवाणी धावला;पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा अविस्मरणीय संघर्ष!

0
2

दि.१०(पीसीबी)-छत्रपती संभाजीनगरमधील एसआरपीएफ पोलीस भरतीच्या मैदानावर काल एक वेगळीच कहाणी पाहायला मिळाली. या पोलीस भरतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण याठिकाणी आले होते. यापैकी अनेक तरुणांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे काही जणांकडून पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेसाठी धावताना बूट विकत घ्यायलाही पैसे नव्हते. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द असेल तर स्वप्न पूर्ण होऊ शकतं, याचं जिवंत उदाहरण इथे समोर आले. खाकी वर्दीचं स्वप्न डोळ्यांत घेऊन शेकडो तरुण भरतीसाठी मैदानावर उतरले होते. कुणाच्या पायात महागडे शूज, तर कुणाकडे उत्तम तयारी, पण याच गर्दीत एक असा तरुण होता, ज्याच्याकडे धावण्यासाठी साधे शूजही नव्हते.

भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेले SRPF चे एसपी विक्रम साळी यांची नजर या तरुणावर पडली. त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, “चप्पलवर का धावलास?” “साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते… पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे… ते पूर्ण करणार. हे शब्द ऐकताच तिथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. एका तरुणाची जिद्द, संघर्ष आणि स्वप्नासाठीची धडपड सगळ्यांना भावून गेली.

घरची परिस्थिती हलाखीची. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत, अशा परिस्थितीत सरावासाठी शूज घेणं तर दूरच, पण पोलीस होण्याची जिद्द मात्र प्रचंड आणि म्हणूनच हा तरुण थेट चप्पल घालून पाच किलोमीटरच्या रनिंगसाठी मैदानात उतरला. चप्पलवर धावणं म्हणजे पाय सोलवटणं, वेदना सहन करणं… पण त्याच्या डोळ्यांसमोर होती आई-वडिलांची संघर्षमय कहाणी आणि खाकी वर्दीचं स्वप्न… आणि त्याने जिद्दीच्या जोरावर पूर्ण पाच किलोमीटरचं अंतर धावून पूर्ण केले. यानंतर एसपी विक्रम साळी यांनी या तरुणाला बोलावून घेतले आणि बूट दिले. परिस्थिती माणसाला हरवू शकते, पण जिद्दीला नाही, छत्रपती संभाजीनगरच्या या तरुणाने आज हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. खाकी वर्दीच्या दिशेने त्याची ही धाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.