“पवन खेऱांच्या दिल्लीतील घरी असम पोलिसांची धाड; पासपोर्ट वादाने राजकारण तापलं”

0
2

दि.०७(पीसीबी)-काँग्रेस नेते पवन खेऱा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी असम पोलिसांचे पथक पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत दिल्ली पोलिसही असम पोलिसांना सहकार्य करत आहेत.दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवन खेऱा यांनी असमचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुईयान यांच्याकडे तीन पासपोर्ट असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच, त्यांच्या नावावर यूएईमध्ये मालमत्ता आणि अमेरिकेतील वायोमिंग येथे कंपनी असल्याचे कथित कागदपत्रेही त्यांनी सादर केली होती. ही माहिती सरमा यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर करण्यात आलेली नाही, असा दावा खेऱा यांनी केला होता.

या आरोपांनंतर रिनिकी भुईयान यांनी पवन खेऱांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच असम पोलिसांचे पथक त्यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले.दरम्यान, कारवाईच्या वेळी पवन खेऱा घरी नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दावा केला की, खेऱा गुवाहाटीतून निघून हैदराबादला गेले आहेत आणि कायदा आपलं काम करेल.

रिनिकी भुईयान यांनी खेऱांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असून ती एआय आणि फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी काँग्रेसवर बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तीव्र प्रतिक्रिया दिली.मुख्यमंत्री सरमा यांनीही हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आणि पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, कथित कागदपत्रांवर केलेल्या तपासात अनेक विसंगती आढळल्या असून, रिव्हर्स सर्चमध्ये ती कागदपत्रे इतर व्यक्तींची असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी केंद्र सरकारने संबंधित तीन देशांकडून स्पष्टीकरण मागवले असून, त्या सर्व देशांनी ही कागदपत्रे बनावट असल्याचे संकेत दिले आहेत.दरम्यान, ९ एप्रिल रोजी होणाऱ्या असम विधानसभा निवडणुकांपूर्वी हा वाद उफाळल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.